व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण गडकरींच्या घराशेजारीच अनिल सोले थाटणार प्रचार कार्यालय; आता माघार नाहीच

गडकरींच्या घराशेजारीच अनिल सोले थाटणार प्रचार कार्यालय; आता माघार नाहीच

गिरीश व्यास यांनी उघडे करून दिले स्वतःचे कार्यालय

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत कलह आता अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी पक्षाला थेट ओपन चॅलेंज दिले आहे. सोले हे निवडणुकीतून माघार घेणार नसून, भाजपचे माजी आमदार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जाणारे नेते गिरीश व्यास यांच्या बडकस चौकातील कार्यालयातूनच आपला प्रचार सुरू करणार आहेत.

या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. विशेष म्हणजे हे कार्यालय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे आमदार प्रवीण दटके यांच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे.

गडकरींच्या घराजवळच पक्षाच्या बंडखोर उमेदवाराचे कार्यालय सुरू होत असल्याने, सोले यांनी भाजपच्या नेतृत्वाला उघड आव्हान दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपने अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते सोले यांच्यापासून अंतर ठेवतील, असा अंदाज होता; मात्र चित्र पूर्णपणे उलट दिसत आहे.

मुनगंटीवारांचा एक फोन अन् वर्षांपासून रखडलेली शिवणीची एसटी धावू लागली

गिरीश व्यास यांनी स्वतःचे कार्यालय उपलब्ध करून दिल्याने भाजपमधील निष्ठावंतांचा गट सोले यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय, निवडणुकीच्या घोषणेनंतर व्यास आणि आमदार संजय भेंडे यांनी आयोजित केलेल्या सोले यांच्या सत्कार कार्यक्रमाला नितीन गडकरी यांनीही हजेरी लावली होती. सध्या नागपुरातील अनेक स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उघडपणे अनिल सोले यांचा प्रचार सोशल मीडियावर करत आहेत.
या सर्व घडामोडींमागे भाजपमधील अंतर्गत गटबाजी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

अर्ज माघारीच्या ऐन मोक्यावर माजी आमदार ‘नॉट रिचेबल’; भाजपचे वाढले टेंशन

सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीसाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार आग्रह धरला होता. मात्र, पालकमंत्र्यांचा हा निर्णय स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला नाही. आता उघडपणे सोले यांच्या पाठीशी उभे राहून स्थानिक नेते पालकमंत्र्यांच्या निर्णयाला छेद देत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अनिल सोले यांचा दांडगा जनसंपर्क आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची मिळणारी छुपी व उघड साथ, यामुळे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या अडचणी कमालीच्या वाढल्या असून, मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही भाजपला अंतर्गत बंडखोरीचा फटका बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!