व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nasrapur girl case : नसरापूरच्या चिमुरडीसाठी महाराष्ट्र पेटला! महिला आयोगाचा अल्टिमेटम

Nasrapur girl case : नसरापूरच्या चिमुरडीसाठी महाराष्ट्र पेटला! महिला आयोगाचा अल्टिमेटम

pune-bhor-nasrapur-girl-murder-case-ncw-ultimatum-navale-bridge-rasta-roko : नवले पुलावर संतप्त जनतेचा चार तास रस्ता रोको !

Pune : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अमानुष घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थ, सामाजिक संघटना, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेत सरकार आणि प्रशासनाला तातडीच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पुण्यातील नवले पुलावर चिमुरडीच्या मृतदेहासह तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी नसरापूर परिसरातील ६५ वर्षीय आरोपीने चिमुरडीला गायीचे वासरू दाखवण्याचे आणि जेवण देण्याचे आमिष दाखवून एका गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने दगडाने ठेचून तिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता त्याने मृतदेह गोठ्यातील शेणामध्ये लपवून घटनास्थळावरून पळ काढला. संध्याकाळी मुलगी घरी परतली नाही तेव्हा कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी मुलीला सोबत घेऊन जाताना स्पष्ट दिसला आणि पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.

या प्रकरणानंतर भोर आणि नसरापूर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. न्यायालयात आरोपीला नेत असताना काही आंदोलकांनी पोलीस वाहन अडवण्याचाही प्रयत्न केला. परिस्थिती तणावपूर्ण बनताच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुणे सत्र न्यायालयाने आरोपीला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. आयोगाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला या प्रकरणावर थेट देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यात यावे आणि खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना आयोगाने प्रशासनाला दिल्या आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शनिवारी संध्याकाळी पुण्यातील नवले पुलावर मृत चिमुरडीचा मृतदेह ठेवून ठिय्या आंदोलन सुरू केले. आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कुटुंबीयांशी संवाद साधावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. सुमारे चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत हटणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम होते.

Nagpur Municipal corporation : १९२७ कोटींच्या ‘नाग नदी’ प्रकल्पातून ५ वर्षांत प्रदूषणमुक्तीचे ध्येय

रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच राहिल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवले. काही आंदोलकांनी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आल्याचा तसेच मृत मुलीच्या वडिलांची कॉलर पकडण्यात आल्याचा आरोप केला. मात्र पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आरोप फेटाळून लावत कुटुंबीय स्वखुशीने वाहनात बसल्याचा दावा केला. त्यानंतर रात्री उशिरा चिमुरडीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “ही घटना अत्यंत लज्जास्पद असून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. विशेष सरकारी वकील नेमण्यासाठी उच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी आरोपीविरोधात १९९८ आणि २०१५ मध्येही गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली. तसेच १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करून खटला जलदगतीने चालवण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

या घटनेवर मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “नराधमाचा एन्काऊंटर झाला तरच हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे म्हणता येईल,” अशी आक्रमक फेसबुक पोस्ट त्यांनी केली. तसेच एन्काऊंटर झाला नाही तर भोरच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटल्याने सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

NCP Ajit Pawar : राष्ट्रवादीचे ९० पदाधिकारी राजीनामा देणार? बुलढाण्यात हायव्होल्टेज घडामोडी

नसरापूरमधील या घटनेमुळे राज्यातील महिला आणि बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका निष्पाप चिमुरडीच्या क्रूर हत्येनंतर महाराष्ट्रभरातून कठोर शिक्षेची मागणी होत असून प्रशासन, सरकार आणि न्यायव्यवस्थेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!