nitin-gadkari-new-negative-point-system-driving-licence-cancelled-traffic-rules : नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवी पॉइंट सिस्टिम
New Delhi : वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना आता केवळ दंड भरून सुटका करून घेता येणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक नियम अधिक कडक करण्यासाठी नवीन ‘ग्रेडेड पॉइंट सिस्टिम’ लागू करण्याची योजना जाहीर केली आहे. या व्यवस्थेत चालकाच्या चुकीनुसार त्याच्या वाहन परवान्यावर आणि नोंदणी प्रमाणपत्रावर नकारात्मक गुण नोंदवले जाणार आहेत.
नितीन गडकरी यांनी ६६ व्या सियामच्या वार्षिक कार्यक्रमात बोलताना या प्रस्तावित व्यवस्थेची माहिती दिली. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सातत्याने नियम मोडणाऱ्या चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही प्रणाली आणली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन व्यवस्थेनुसार एखाद्या चालकाने वाहतूक नियम मोडल्यास त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या नोंदीत नकारात्मक गुण जमा होतील. वाहनाच्या आरसीशी संबंधित नोंदीतही गुणांची व्यवस्था केली जाणार आहे. ठरावीक मर्यादेपेक्षा नकारात्मक गुण वाढल्यास संबंधित चालकावर कठोर कारवाई होऊ शकते. त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचाही पर्याय असेल.
Manoj jarange : मनोज जरांगेंच्या मागण्यांवर आज निर्णायक बैठक !
ही व्यवस्था केवळ नियम मोडणाऱ्यांना शिक्षा करण्यापुरती मर्यादित राहणार नाही. सातत्याने वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन देण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. चांगला वाहन चालविण्याचा इतिहास असलेल्या चालकांना विमा कंपन्यांकडून कमी प्रीमियम तसेच इतर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
Rohit Pawar. : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण केव्हा?
गडकरी यांनी जुन्या बीएस-४ वाहनांबाबतही महत्त्वाची माहिती दिली. जुन्या वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष उत्सर्जन नियंत्रण उपकरण विकसित करण्यात आले असून त्याची चाचणी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. या उपकरणाची किंमत अंदाजे चार ते पाच हजार रुपये असू शकते. जुन्या वाहनांमध्ये हे उपकरण बसवल्यानंतर त्यांचे प्रदूषण उत्सर्जन बीएस-६ वाहनांच्या पातळीपर्यंत कमी करण्याचा उद्देश आहे. या नव्या उपाययोजनांमुळे वाहतूक नियमांचे पालन वाढवण्याबरोबरच रस्ते अपघात आणि वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल, असा सरकारचा प्रयत्न आहे.








