nitin-tiwari-joins-shiv-sena-shinde-group-nagpur : महापालिका निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे आले होते चर्चेत
Nagpur : नागपूर महापालिका निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे चर्चेत आलेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी शहरप्रमुख नितीन तिवारी यांनी अखेर आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
मुंबईतील उपमुख्यमंत्री निवासस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नागपूर महापालिका निवडणुकीदरम्यान जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया आणि नितीन तिवारी यांनी एकाच प्रभागातून उमेदवारीचा दावा केला होता. पक्षाने किशोर कुमेरिया यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतरही तिवारी यांनी माघार घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्याकडील शहरप्रमुखपद काढून घेतले होते.
गेल्या दीड दशकाहून अधिक काळ नागपूरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या नितीन तिवारी यांनी युवासेना उपजिल्हाप्रमुख, शिवसेना शहर समन्वयक तसेच शहरप्रमुख यांसारखी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी शहरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भातील आंदोलने, लर्निंग लायसन्स घोटाळ्याविरोधातील मोर्चे तसेच कामगार, बेरोजगार युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे.
Sudhir Mungatiwar : चंद्रपूर विकासाला बूस्टर! मुनगंटीवारांची मागणी अन् मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तिवारी यांनी नागपूरकरांच्या प्रश्नांसाठी भविष्यातही आक्रमक भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनसामान्यांच्या हक्कांसाठी गरज पडल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागे हटणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले. तसेच पक्षाची विचारधारा आणि धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण निष्ठेने काम करण्याची ग्वाही दिली.
___








