BJP state president Ravindra Chavan advises party workers not to give importance to Amit Thackeray : ठाकरेंच्या विधानावरून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुनावले खडे बोल
Pune महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही, अशा कडक शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्याच कार्यकर्त्यांचे कान उपटले आहेत. अमित ठाकरे हा कालचा पोरगा असून तो काहीही बरळतो आणि आपण त्यावर आंदोलन करून त्यांना उगीच मोठे करतो, अशा स्पष्ट सूचना चव्हाण यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्यांच्या कक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी लावलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो अमित ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांनी हटवला होता. या घटनेनंतर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अमित ठाकरे यांच्याविरोधात राज्यभर जोरदार आंदोलने केली होती. मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल झाले. आंदोलन केल्याबद्दल पक्षाकडून शाबासकी मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना मात्र पक्षाच्या बैठकीत भलताच अनुभव आला.
Disha Salian case : कोणालाही आधीच आरोपी ठरवू नका, न्यायालयाने खडसावले; आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची ही भूमिका अजिबात योग्य नसल्याचे सांगत अमित ठाकरेंच्या वक्तव्यांवर किंवा कृतींवर प्रतिक्रिया देऊन त्यांना मोठे करणे थांबवण्याचे निर्देश दिले. विरोधकांना भाजप आक्रमक व्हावा आणि त्यांना फुटेज मिळावे हेच हवे असते, त्यामुळे अशा विषयांवर लक्ष केंद्रित करू नका, असा सल्ला त्यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता, मात्र अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवलेल्या जागेवरून भाजप, शिंदे सेना आणि मनसेमध्ये तुफान वाद झाला होता. युतीतील या त्रिकोणी लढतीत ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आला होता, तर शिंदे सेनेचे सदा सरवणकर यांचा पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर मनसे आणि अमित ठाकरेंबाबत भाजप प्रदेशाध्यक्षांनी घेतलेली ही रोखठोक भूमिका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.








