व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bachchu kadu : “मुख्यमंत्रिपदासाठी आम्हीही घरी जाऊन पाठिंबा दिला होता”

Bachchu kadu : “मुख्यमंत्रिपदासाठी आम्हीही घरी जाऊन पाठिंबा दिला होता”

bachchu-kadu-reaction-on-uddhav-thakare-cabinet-minister-promise-maharashtra-politics : बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, कॅबिनेट मंत्रिपदाच्या शब्दाचा गौप्यस्फोट

Mumbai : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आम्हीही त्यांच्या घरी जाऊन त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला होता,” असे म्हणत बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या काळातील अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता, मात्र प्रत्यक्षात राज्यमंत्रिपद दिल्याचा गौप्यस्फोटही केला.

काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी आपला प्रहार जनशक्ती पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करत धनुष्यबाण हाती घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत “घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक होती,” असे वक्तव्य केले होते. या टीकेनंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंना थेट प्रत्युत्तर दिले.

Defence project : देशातील सर्वात मोठ्या क्षेपणास्त्र आणि तोफगोळा प्रकल्पाचे लोकार्पण

बच्चू कडू म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्याकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही आधी मुख्यमंत्री झालात की मी आधी राज्यमंत्री झालो? महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार याबाबत मोठा संभ्रम होता. त्या काळात माझ्या पक्षाचे दोन आमदार होते आणि अनेक पक्षांकडून मला ऑफर येत होत्या.”

त्यांनी पुढे सांगितले की, “त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली. त्यानंतर आम्ही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता ते आमच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करत असतील तर ते चुकीचे आहे.”

Mlc election : ‘त्या’ एका जागेसाठी भाजप-शिंदे सेना आमनेसामने; फडणवीसांच्या बैठकीकडे लक्ष

यावेळी बच्चू कडू यांनी मोठा दावा करत सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. “मला सुरुवातीला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता. मात्र नंतर ते शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले आणि मला राज्यमंत्रिपद देण्यात आले. शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. आम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ अधिक दिसावे आणि मुख्यमंत्रिपदावर दावा करता यावा, अशी त्यावेळची भूमिका होती,” असे बच्चू कडू यांनी म्हटले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्री येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला होता. “आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक झाली. लोभापायी जे गेले त्यांना जाऊ द्या,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली होती.

Buldhana politics : जिल्हा राजकारणाचे ‘पॉवर सेंटर’ बनले जळगाव जामोद

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना च्या अग्रलेखातूनही बच्चू कडू यांच्यावर टीका करण्यात आली होती. “सत्ताबदलाची चाहूल लागताच त्यांनी मिंध्यांची भलामण सुरू केली. मंत्रिपद न मिळाल्यावर पुन्हा आंदोलनं सुरू केली. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांची तडफड वाढली,” अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली होती.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या या विधानांमुळे महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या काळातील राजकीय पडद्यामागील हालचाली पुन्हा चर्चेत आल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यात सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

_

error: Content is protected !!