sanjay-raut-manoj-jarange-mahayuti-government-maratha-reservation : संजय राऊतांचा घणाघात
Nagpur : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा १२वा दिवस उजाडला असून, यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
निवडणुकीपूर्वी महायुतीने मनोज जरांगे यांचा वापर करून घेतला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. “या सरकारला जरांगेंचा बळी घ्यायचा आहे का?” असा गंभीर सवाल करत, “जरांगे आता महायुती सरकारच्या गळ्याचा फास बनले आहेत,” असा निशाणा राऊत यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान साधला. सध्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू असून, ढासळत्या प्रकृतीमुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; मात्र आता जात वैधता पडताळणी समितीकडून हे दाखले रद्द केले जात आहेत. नगरसेवकांचे पदही यामुळे धोक्यात आल्याने जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे.
Nitin Gadkari : नियम तोडाल तर फक्त चालान नाही, थेट लायसन्स रद्द!
दुसरीकडे, सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला असला, तरी जरांगे उपोषणावर ठाम आहेत. त्यांनी १२ सप्टेंबरला सर्व मराठा बांधवांना मुंबईत एकत्र येण्याचे मोठे आवाहन केले आहे. यापूर्वीच्या आंदोलनाप्रमाणेच पुन्हा मुंबई ठप्प होण्याचा धोका निर्माण झाल्याने महायुती सरकारची चिंता वाढली आहे.








