operation-tiger-secret-ashish-jaiswal-one-shiv-sena-eknath-shinde : ऑपरेशन टायगर न सांगता होणार – अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल
Nagpur : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत देत ‘ऑपरेशन टायगर’ कोणालाही न सांगता आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता होईल, असा खळबळजनक दावा अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केला आहे. २०२२ मध्ये झालेला राजकीय उठावही कोणाला सांगून झाला नव्हता, याची आठवण करून देत भविष्यात महाराष्ट्रात फक्त आणि फक्त एकच शिवसेना उरेल आणि ती एकनाथ शिंदे यांचीच असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना आशिष जयस्वाल यांनी राज्यातील संभाव्य राजकीय घडामोडींसह राज्याची आर्थिक स्थिती, तसेच दिशा सालियन आणि सचिन वाझे प्रकरणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. राजकारणात कोणतीही गोष्ट ठरवून किंवा पूर्वनियोजित पद्धतीने होत नसते, असे जयस्वाल म्हणाले. २०२२ मधील राजकीय उठावाची पूर्वकल्पना कोणालाही नव्हती. त्याचप्रमाणे ‘ऑपरेशन टायगर’ही कोणाला न सांगता घडून येईल, असा दावा त्यांनी केला.
Sanjay Raut : एमपीएससी पेपरफुटीमागे भाजपचेच कार्यकर्ते; संजय राऊतांचा घणाघात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अहोरात्र कामामुळे आणि प्रभावी नेतृत्वामुळे मोठ्या संख्येने लोक त्यांच्याशी जोडले जात असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. २०२२ पासून आजपर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत; मात्र शिंदे यांच्या शिवसेनेतून एकही व्यक्ती बाहेर पडलेली नाही, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे भविष्यात एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरी आणि एकमेव शिवसेना म्हणून उरेल, ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे जयस्वाल यांनी ठामपणे सांगितले.
राज्याच्या तिजोरीवर वाढत असलेल्या आर्थिक ताणाबाबत विचारले असता जयस्वाल यांनी महायुती सरकारची भूमिका स्पष्ट केली. सरकारने जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची कर्जमाफी असो किंवा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, यामध्ये सरकारकडून कोणताही कट किंवा अटी लादण्यात आलेल्या नसल्याचा दावा त्यांनी केला. सध्या राज्याचे उत्पन्न आणि खर्च यामध्ये तफावत असून खर्च उत्पन्नापेक्षा अधिक आहे. त्यामुळे नव्या कामांना मंजुरी देण्याऐवजी जुनी देणी पूर्ण करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच विविध माध्यमांतून राज्याचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचेही अर्थराज्यमंत्र्यांनी सांगितले.
दिशा सालियन प्रकरण आणि सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्याबाबत विचारले असता जयस्वाल यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. ‘सचिन वाझे हा काही आतंकवादी आहे का?’ असा सवाल महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केला होता, अशी आठवण करून देत जयस्वाल यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात वसुलीचा उघड कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप केला. या प्रकारामुळे संपूर्ण देशभरात महाराष्ट्राची बदनामी झाल्याचा दावाही त्यांनी केला.
या प्रकरणात पुढील काळात नवनवीन बाबी आणि पुरावे समोर येतील, त्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले. राज्यातील संभाव्य राजकीय घडामोडींबाबत अर्थराज्यमंत्र्यांनी केलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
__








