Sanjay Raut reiterates his claim that Devendra Fadnavis will move to the Centre : केंद्रात जाण्याच्या घाईने महायुतीची समन्वय बैठक, महामंडळाचे वाटप करण्याची धडपड
Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याचा दावा करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीत जाण्याची वेळ जवळ आली असून ते मुंबईतील कामांची आवराआवर करत आहेत. महायुतीची तातडीची समन्वय बैठक आणि गेली दोन वर्षे रखडलेले महामंडळ वाटप पूर्ण करण्याचा धडपड हा त्याच आवराआवरीचा भाग आहे, असा सनसनाटी दावा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.
राऊत यांच्या दाव्यानुसार, दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला असून ही महत्त्वाची जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात फडणवीसांसोबत चर्चा केल्याचा पुनरुच्चार करत राऊत म्हणाले, ते उच्चशिक्षित असून देशाचे शिक्षणमंत्री होण्यासाठी एकदम पात्र आहेत. ते दिल्लीत जात असतील तर आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. तथापि, भाजप नेत्यांसह खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांचे हे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. मी देशात कुठेही गेलो तरी माझ्या दिल्लीवारीच्या चर्चा रंगवल्या जातात. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी दिली असून मी महाराष्ट्रातच राहून जनतेची सेवा करणार आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे.
Vijay wadettiwar: कुंभमेळ्यासाठी पैसे आहेत, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नाहीत का?
या राजकीय चिखलफेकीच्या पार्श्वभूमीवर, महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि स्थानिक पातळीवरील धुसफूस मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलावण्यात आलेल्या विशेष समन्वय समितीच्या बैठकीत त्यांनी सर्व घटक पक्षांना कडक शब्दांत ताकीद दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रमुख उपस्थित होते.
Rahul Gandhi: राहुल गांधींच्या ‘त्या’ ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
स्थानिक पातळीवर समन्वय राखण्याचे निर्देश देताना, महायुतीतील कोणत्याही आमदार किंवा खासदाराने एकमेकांच्या नेत्यांवर अथवा मित्रपक्षांवर सार्वजनिकरीत्या चिखलफेक किंवा टीका टिप्पणी करू नये, असे सक्त आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या बैठकीत रखडलेली महामंडळ वाटपे आणि जिल्हा नियोजन समित्यांच्या निधीवाटपाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यामुळे एका बाजूला संजय राऊतांचे दिल्लीवारीचे दावे आणि दुसऱ्या बाजूला महायुतीत शिस्त आणण्यासाठी फडणवीसांनी उगारलेला बडगा, यामुळे राज्याचे राजकारण पूर्णपणे तापले आहे.







