sunetra-pawar-rajya-sabha-seat-ncp-leaders-race-rupali-chakankar-political-update : परांजपेंचीही फिल्डींग, आणखी पाच नेते शर्यतीत, चाकणकरांच्या भवितव्याकडेही लक्ष
Mumbai : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेतील जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत पक्षात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून इच्छुक नेत्यांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अनेक महत्त्वाची संघटनात्मक पदे रिक्त असल्याने आगामी काही दिवसांत मोठे राजकीय फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत उपराष्ट्रपतींची भेट घेऊन राज्यसभेच्या सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा सादर केला. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी तब्बल दोन लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवत स्वतःची राजकीय ताकद सिद्ध केली. या विजयानंतर त्यांना राज्याच्या सक्रिय राजकारणात अधिक महत्त्वाची भूमिका दिली जाणार असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. त्यानंतर त्यांनी राज्यसभेची जागा रिक्त केल्याने आता या जागेवरून पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे.
NCP Ajit Pawar : राजीनामा नाट्य संपले; ‘स्क्रिप्ट’ अजून बाकीच! इव्हेंट मॅनेजमेंट झाल्याचा आरोप
राज्यसभेच्या जागेसाठी आनंद परांजपे, भुजबळ कुटुंबातील प्रतिनिधी, मलिक कुटुंबातील सदस्य, अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांची नावे चर्चेत आहेत. पक्षातील विविध गटांकडून आपापल्या नेत्यासाठी प्रयत्न सुरू असून अंतिम निर्णय सुनिता पवार आणि सुनील तटकरे यांच्या चर्चेनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटनात्मक विस्तार लक्षात घेऊन जातीय, प्रादेशिक आणि राजकीय समीकरणांचा विचार करूनच राज्यसभेसाठी उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यसभा जागेबरोबरच पक्षातील इतर महत्त्वाच्या नियुक्त्यांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. युवक प्रदेशाध्यक्ष पद मागील दहा महिन्यांपासून रिक्त आहे. सूरज चव्हाण यांना पदावरून बाजूला केल्यानंतर अद्याप नव्या अध्यक्षाची नियुक्ती झालेली नाही. त्याचप्रमाणे रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही निर्णय प्रलंबित आहे. महिला आयोगातील बदल आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या यावरही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाबाबतही राष्ट्रवादीत संभ्रम कायम आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी या पदासाठी अधिकृत नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई संघटनेतही अनेक इच्छुक सक्रिय झाले असून आगामी काळात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.
Bacchu Kadu : अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांना साकडे
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे राज्यसभेत तीन खासदार आहेत. त्यामध्ये प्रफुल पटेल, पार्थ पवार आणि नितीनकाका पाटील यांचा समावेश आहे. प्रफुल पटेल यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत असून नितीनकाका पाटील २०२८ पर्यंत राज्यसभेत राहणार आहेत. तर नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेले पार्थ पवार यांचा कार्यकाळ २०३२ पर्यंत आहे. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांच्या जागेवर पक्ष कोणत्या चेहऱ्यावर विश्वास दाखवतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








