रोहित पवारांच्या आरोपावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘सर्वांनी संवेदनशील राहावे!’
Mumbai : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असताना, आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ‘मफलर मॅन’ म्हणून समोर आणल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांच्या आरोपांमागे अजित पवार यांच्याविषयी असलेली भावनिक जवळीक आणि न्याय मिळवण्याची तळमळ असल्याचे सांगतानाच, या संवेदनशील प्रकरणाचे राजकीय किंवा माध्यमांमधील प्रदर्शन होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
रोहित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी व्हीएसआर विमान कंपनीचे संचालक रोहित सिंग यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असल्याचा फोटो दाखवत त्यांना ‘मफलर मॅन’ असे संबोधले. संबंधित व्यक्तीने अजित पवारांच्या अपघाताला जबाबदार असल्याचा आरोप आपण करत नसून, विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजितदादा आणि रोहित पवार यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे काकांच्या निधनानंतर रोहितच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्याला आपल्या काकांसोबत नेमके काय घडले, याची उत्तरे हवी आहेत. याबाबत आपल्याला रोहितशी बोलावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताचा चौकशी अहवाल लवकरात लवकर समोर यावा, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर केली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील या विषयात आता अधिकृत अहवालाची प्रतीक्षा करणे आवश्यक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी भावनिक शब्दांत माध्यमे आणि राजकीय नेत्यांना आवाहन केले. त्या म्हणाल्या, “माझा भाऊ गेला आहे, हा आमच्यासाठी ब्रेकिंग न्यूजचा विषय नाही. या प्रकरणात सर्वांनी संवेदनशील राहावे, ही हात जोडून विनंती आहे.” दरम्यान, रोहित पवार यांनी अपघातापूर्वी अजित पवार यांच्या प्रवासाच्या नियोजनात बदल झाल्याचा, तसेच बारामती पोलिसांकडे तक्रार दाखल करताना अडचणी आल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकात झिरो एफआयआर दाखल केल्यानंतर प्रकरण महाराष्ट्रात वर्ग झाल्याचेही त्यांनी सांगितले. सीआयडीकडून या तक्रारीची हाताळणी आणि तपासाच्या प्रक्रियेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
अजित पवारांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले!
एकीकडे रोहित पवार यांचे गंभीर आरोप, दुसरीकडे संजय राऊत यांची भाजपवर टीका आणि आता सुप्रिया सुळे यांचे संयम व संवेदनशीलतेचे आवाहन, यामुळे अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. मात्र, या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि विविध आरोपांचे सत्य अधिकृत तपास अहवालातूनच स्पष्ट होणार आहे.








