Shivsena leader suresh mapari joins BJP with many supporters : भाकरी फिरताच राजकीय भूकंप; नगर परिषदेतही समीकरण बदलणार
Washim उद्धवसेनेत जिल्हाप्रमुख बदलल्यानंतर अवघ्या २४ तासांत वाशिमच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. ‘मातोश्री’वरून बालाजी वानखेडे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती होताच मावळते जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी समर्थकांसह थेट भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
वाशिम नगर परिषद निवडणुकीदरम्यान भाजप आणि उद्धवसेना यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. मतदानाच्या आदल्या रात्रीपासून मतदानाच्या दिवशीपर्यंत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. मात्र, निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवेळी उपाध्यक्ष आणि सभापतीपदासाठी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सुरेश मापारी यांच्या जागी बालाजी वानखेडे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षांतर्गत हालचालींना वेग आला. २३ मेच्या रात्री मापारी समर्थकांसह मुंबईत दाखल झाले. त्यानंतर २४ मे रोजी भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Petrol diesel price hike : 10 दिवसांत पेट्रोल प्रति लिटर 7.35 तर डिझेल 7.53 रुपयांनी महागले !
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे काही माजी सदस्य, १२ सरपंच आणि ८ नगरसेवक आपल्या सोबत असल्याचा दावा मापारी यांनी केला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा उद्धवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
१३ नगरसेवकांमुळे वाढली उत्सुकता
वाशिम नगर परिषदेत उद्धवसेनेचे १३ नगरसेवक आहेत. त्यापैकी आठ नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा मापारी यांनी केल्याने नगर परिषदेतही सत्तासमीकरणे बदलण्याची चर्चा रंगली आहे. या नगरसेवकांनी भाजपची वाट धरल्यास उद्धवसेनेला सत्तेबाहेर जावे लागू शकते, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.
माजी जिल्हाप्रमुख भाजपमध्ये दाखल झाले असले तरी सहाही तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, नगरसेवक आणि शिवसैनिक उद्धवसेनेसह ठाम असल्याचा दावा नवे जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वाशिम जिल्ह्याची निर्मिती केली असून, सच्चे शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Mlc Election : नवा फॉर्म्युला, शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला फक्त 1 जागा?
“हा तर ट्रेलर…” विधानाची चर्चा
भाजपमध्ये प्रवेश करताना सुरेश मापारी यांनी “हा तर ट्रेलर आहे, चित्रपट अजून बाकी आहे,” असे विधान केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धवसेनेत आणखी राजकीय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पक्षातील पडझड रोखण्यासाठी खासदार संजय देशमुख, जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी तातडीने शिवसैनिकांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.








