mahayuti-new-formula-12-4-1-vidhan-parishad-election-2026-seat-sharing : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत जागावाटपात मोठा बदल
Mumbai : महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चांना वेग आला असून नव्या फॉर्म्युल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या प्रस्तावित जागावाटपात भाजपला 12, शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे यापूर्वी चर्चेत असलेल्या 12-3-2 या फॉर्म्युल्यात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये सलग बैठका सुरू असून अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यात आज किंवा उद्या महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Donald trump : अमेरिकेत पुन्हा थरार! व्हाईट हाऊसबाहेर हल्लेखोराचा तुफान गोळीबार
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी-हिंगोली या चार जागा जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हिंगोली-परभणी मतदारसंघावर शिवसेनेने जोरदार दावा केला असून ही जागा पक्षाकडेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेने आपल्या पारंपरिक प्रभावक्षेत्रातील जागा कायम राखण्यात यश मिळवल्याची चर्चा महायुतीत सुरू आहे.
दुसरीकडे रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही एकमेव जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेपेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागू शकते, अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पुणे मतदारसंघावर भाजपने आपला दावा कायम ठेवला असून पक्ष या जागेवर तडजोड करण्याच्या तयारीत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
MLA fund : आमदार निधीची विकासगती मंदावली; ९५२ कामे रखडली, नव्या ४६० मंजुरींवरही प्रश्नचिन्ह
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्याने विधान परिषदेच्या अनेक जागा गेल्या दोन अडीच वर्षांपासून रिक्त आहेत. पूर्वी निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही आवश्यक मतदारसंख्या उपलब्ध नसल्यामुळे निवडणुका घेता आल्या नव्हत्या. आता संबंधित मतदारसंघांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक मतदारसंख्या उपलब्ध झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून दिले जातात. यावेळी सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक आणि अमरावती या मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे.
Fuel crisis : शेतकरी इंधनासाठी रांगेत; शासनाने ‘हवेतील’ विधाने सोडून वास्तव पाहावे!
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 25 मे रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जून असेल. 2 जून रोजी अर्जांची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
महायुतीतील नव्या जागावाटपामुळे राज्यातील राजकीय समीकरणांना नवा ट्विस्ट मिळण्याची शक्यता असून आगामी काही दिवसांत अंतिम निर्णयानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
_








