व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Municipal election : अन्नत्याग, पक्षांतर आणि स्मशानभूमीतील एबी फॉर्ममुळे राजकीय नाट्य

Municipal election : अन्नत्याग, पक्षांतर आणि स्मशानभूमीतील एबी फॉर्ममुळे राजकीय नाट्य

Confusion across state ticket distribution in municipal elections : सर्व महानगरपालिका निवडणुकांत तिकीट वाटपामुळे राज्यभर गोंधळ

Mumbai : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या १५ ते १६ दिवसांत मतदान आणि मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर होणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. मात्र उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेतून अनेक ठिकाणी असंतोष, वाद, आंदोलन आणि भावनिक प्रसंग समोर आल्याने निवडणुकीपूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली असून आज कागदपत्रांची छाननी होणार आहे. या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपामुळे अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. तिकीट न मिळाल्याने अनेक ठिकाणी रडारड, गोंधळ आणि आंदोलन झाल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी तर उमेदवारी नाकारल्यामुळे इच्छुकांनी थेट पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

Akola Municipal Corporation Election : विधानसभा भाजपच्या विरोधात लढली, आता घरवापसी

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने दोन महिला पदाधिकाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. दिव्या मराठे आणि वर्षा साळुंके या गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपसाठी काम करत असूनही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्या ठिकाणी आम्हाला डावलून इतरांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्या उमेदवारांची नावे रद्द करावीत, या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील भाजपच्या अंतर्गत नाराजीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान नागपूरमध्ये उमेदवारी वाटपादरम्यान एक हृदयद्रावक आणि तितकाच चर्चेत असलेला प्रसंग घडला. शिवसेना (शिंदे गट) कडून नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधून योगेश गोन्नाडे यांना, तर प्रभाग क्रमांक ८ मधून त्यांची मुलगी कृतिका गोन्नाडे हिला उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र काल योगेश गोन्नाडे यांच्या आईचे निधन झाले. आज नागपूरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असल्याने स्थानिक शिवसेना नेत्यांनी थेट स्मशानभूमीत जाऊन योगेश गोन्नाडे आणि कृतिका गोन्नाडे यांना एबी फॉर्म सुपूर्त केला.

Uddhav Balasaheb Thackeray : पहिले नाव नव्हते, नंतर थेट एबी फॉर्म, माजी महापौरांना दिलासा!

आईच्या निधनाचे दुःख आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेल्या उमेदवारीचा क्षण, अशा दुहेरी भावनिक अवस्थेत योगेश गोन्नाडे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. या घटनेने नागपूरसह राज्यभरात भावनिक प्रतिक्रिया उमटल्या असून निवडणुकीतील राजकीय वास्तव किती कठोर असते, हे समोर आले आहे.

मुंबईसह राज्यातील सर्वच महानगरपालिकांमध्ये सत्तेसाठी तीव्र चुरस पाहायला मिळत असून उमेदवारीच्या वादामुळे निर्माण झालेला असंतोष मतदानाच्या दिवशी काय परिणाम दाखवतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

__

error: Content is protected !!