व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Supriya Sule : लोकसभा जागा ५० टक्क्यांनी वाढवल्यासच पाठिंब्याचा विचार!

Supriya Sule : लोकसभा जागा ५० टक्क्यांनी वाढवल्यासच पाठिंब्याचा विचार!

supriya-sule-on-lok-sabha-seat-delimitation-nda-support-sharad-pawar-ncp-stand : सुप्रिया सुळेंची भूमिका चर्चेत; एनडीए समर्थनाच्या चर्चांवरही दिले स्पष्टीकरण

Mumbai: संसदेच्या २० जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकसभा जागावाढ या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या जागा सर्व राज्यांसाठी ५० टक्क्यांनी वाढवण्याची तरतूद केल्यास संबंधित विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत विचार करता येईल, असे वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी पक्षाने अद्याप कोणतीही अंतिम भूमिका घेतलेली नसल्याचे स्पष्ट करत एनडीएला समर्थन देण्याच्या चर्चांवरही स्पष्टीकरण दिले आहे.

एका मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात सर्व राज्यांसाठी लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढवण्याची तरतूद केल्यास त्याला पाठिंबा देण्याचा विचार केला जाईल. ही भूमिका नवी नसून पक्षाची पूर्वीपासूनचीच भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींना आणखी एक धक्का, १०० कोटींची मोफत साडी बंद !

यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी भूमिका अधिक स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, सरकारने अद्याप सुधारित विधेयक संसदेत मांडलेले नाही. विधेयकाचा अंतिम मसुदा समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ‘इंडिया’ आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करून सामूहिक निर्णय घेईल. मतदारसंघांचे सीमांकन आणि जागावाटपाचे सूत्र स्पष्ट झाल्यानंतरच अंतिम भूमिका निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, माध्यमांमध्ये पक्षाच्या भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिले. मतदारसंघ पुनर्रचनेबाबत पक्षाने कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसून, सरकार अधिकृतपणे विधेयक संसदेत मांडल्यानंतरच पक्षांतर्गत आणि ‘इंडिया’ आघाडीतील चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एनडीएला समर्थन देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी कोणताही अधिकृत आधार नसल्याचे सांगितले.

Ambadas Danve : ‘नवनीत राणा, नवनाथ बन हे चिल्लर विषय’

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सध्या १० आमदार आणि ८ खासदार आहेत. संख्याबळ कमी असले तरी भविष्यातील संभाव्य घटनादुरुस्ती विधेयकांसाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असल्याने संसदेत या पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचना, लोकसभा जागावाढ आणि त्यासंदर्भातील भूमिका याकडे सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही लक्ष लागले आहे.

दरम्यान, लोकसभा जागा वाढवण्याच्या प्रस्तावावर आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर केंद्र सरकार नेमकी कोणती भूमिका घेते, तसेच त्यानंतर ‘इंडिया’ आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अंतिम निर्णय काय असतो, याकडे देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

_

error: Content is protected !!