IndiGo Flight Crisis: तिकिटे रद्द मंत्री- आमदारांनाही फटका

Samriddhi, rail and charter options for winter session : हिवाळी अधिवेशनासाठी समृद्धी, रेल्वे आणि चार्टरचा पर्याय

Mumbai: इंडिगो विमान सेवेमधील गोंधळ सहाव्या दिवशीही कायम राहिल्याने सर्वसामान्यांसोबत मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मोठी धावपळ झाली आहे. उद्यापासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुंबई आणि पुण्यासह विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी नागपूरकडे रवाना होणार होते. मात्र इंडिगोने महत्त्वाच्या मार्गांवरील उड्डाणे वारंवार रद्द केल्याने त्यांचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले.

मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर या गजबजलेल्या मार्गांवरील उड्डाणे तासन्तास विलंबित राहिली किंवा अचानक रद्द झाली, त्यामुळे हिवाळी अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी आजच नागपुरात पोहोचणे आवश्यक असलेल्या मंत्र्यांना आणि आमदारांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागला. इंडिगोची तिकिटे रद्द करून अनेकांनी समृद्धी महामार्ग हा पर्याय स्वीकारला असून काहींनी रेल्वे प्रवासाचे नियोजन केले आहे. तर काही मंत्र्यांनी अखेर चार्टर विमानाचा पर्याय निवडल्याचे समजते. इतर विमान कंपन्यांनी मागणी वाढताच तिकीट दरात मोठी वाढ केल्याने प्रवाशांसह लोकप्रतिनिधींच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

Tapovan tree cutting : तपोवन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी हालचाल

मुंबई विमानतळावर इंडिगो काउंटरसमोर प्रवासी अजूनही रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून आले. अनेकांना आपली तिकिटे परत करावी लागली असून काही प्रवासी अद्याप सामानाच्या प्रतीक्षेत आहेत. देशाच्या विविध भागांत जाणारे अनेक प्रवासी उड्डाण रद्द झाल्याने अडकल्याचे सांगत होते. एका महिलेला लग्नासाठी तातडीने बाहेर पडायचे होते, मात्र तिची फ्लाइट रद्द झाली आणि सामानही मिळाले नाही असे कळते. काही प्रवाशांनी इंडिगोकडून कोणतीही पुढील माहिती न मिळाल्याची तक्रार केली.

इंडिगो कर्मचाऱ्यांनी मात्र परिस्थिती सुधारत असल्याचा दावा केला असून सकाळपासून उड्डाणे सुरू झाल्याचे सांगितले. येणाऱ्या प्रवाशांचे सत्यापन करून त्यांना बोर्डिंग दिले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी नमूद केले. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू असून लवकरच सर्व काही सुरळीत होईल असेही आश्वासन देण्यात आले. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या महिला प्रवाशीसाठी विशेष प्राधान्याने व्यवस्था केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Local Body Elections : ११ पालिकांच्या निकालावर ठरेल भविष्यातील राजकारण

इंडिगोमधील तांत्रिक आणि मनुष्यबळाशी संबंधित समस्या अद्याप पूर्णपणे निवळल्या नसल्याने देशभरातील उड्डाण व्यवस्थेवर परिणाम कायम आहे. मात्र नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना अचानक पर्यायी मार्ग स्वीकारावा लागल्याने विमान कंपनीच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त होत आहे. परिस्थिती तत्काळ सुरळीत न झाल्यास नागपुरातील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थितीची शक्यता व्यक्त केली जात आहे.