व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Activists anger : आ. किशोर जोरगेवार, आपण ही मोठी चूक केली…! कार्यकर्त्यांचा...

Activists anger : आ. किशोर जोरगेवार, आपण ही मोठी चूक केली…! कार्यकर्त्यांचा संताप

cancels inauguration of cancer hospital in presence of Sarsanghchalak : सरसंघचालकांच्या उपस्थितीतील कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनाला खोडा

Chandrapur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याला विरोध करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला पत्र लिहून हालचाली केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यात तीव्र राजकीय खळबळ उडाली आहे. या कृतीमुळे संघ स्वयंसेवक, भाजप कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, “जनसेवेच्या कार्यक्रमात राजकारण घुसवण्याचा हा प्रयत्न आहे,” अशी टीका जोरदारपणे होत आहे.

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलच्या उद्घाटनालाच प्रश्नचिन्ह लावणे अत्यंत दुर्दैवी, चिंताजनक आणि जनभावनांना धक्का देणारे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. कॅन्सर हॉस्पिटल संदर्भात जोरगेवारांनी प्रशासनाला दिलेले एक पत्र सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. हे हॉस्पिटल कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे नसून, चंद्रपूर आणि परिसरातील जनतेच्या आरोग्यासाठी आहे. अशा सेवाभावी उपक्रमाला विरोध करणे हा केवळ प्रशासकीय मुद्दा नसून वैचारिक अधःपतन असल्याचे मत संघ वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Prashant Jagtap : अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर राजीनामा

आमदार किशोर जोरगेवार सध्या व्हिडिओद्वारे “मी उद्घाटनाला विरोध केला नाही” अशी भूमिका मांडत असले तरी त्यांच्या स्वतःच्या पत्रातील मजकूर याच्या पूर्णपणे विरोधात असल्याचा आरोप केला जात आहे. पत्रात पाणीपुरवठा, मनुष्यबळ आणि अपुऱ्या सोयीसुविधांचा मुद्दा उपस्थित करत “उद्घाटन करणे कितपत योग्य ठरेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे” आणि “अर्ध्या अधुऱ्या सोयीनिशी उद्घाटन करणे रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखे ठरेल” असे स्पष्ट शब्द वापरण्यात आले आहेत. या दोन वाक्यांचा थेट आणि निर्विवाद अर्थ उद्घाटन कार्यक्रम होऊ नये, तो तात्काळ थांबवण्यात यावा, असाच असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

संघ स्वयंसेवकांचा सवाल आहे की, जर केवळ आढावा बैठक घ्यायची होती तर उद्घाटन थांबवण्याच्या आशयाचे पत्र लिहिण्याची गरज काय होती. संवादाचे अनेक मार्ग उपलब्ध असताना थेट विरोधाची भूमिका का घेण्यात आली, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत चंद्रपूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आधीच असताना, त्यापूर्वी कोणतीही बैठक न घेता अशा स्वरूपाचे पत्र लिहिणे हे जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचे कृत्य असल्याचा आरोप होत आहे.

भाजपाचे आमदार असताना प्रशासनाकडे गंभीर प्रश्न निर्माण करून, एका सेवाभावी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने संघ कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही,” अशा शब्दांत कार्यकर्ते आपला रोष व्यक्त करत आहेत. याशिवाय, चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलच्या संकल्पना, नियोजन, पाठपुरावा किंवा निधी उभारणीमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांचा कोणताही प्रत्यक्ष सहभाग नव्हता, ही बाबही प्रकर्षाने मांडली जात आहे.

आजपर्यंत त्यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्याला केंद्र किंवा राज्य शासनाकडून मोठा विकास प्रकल्प किंवा भरीव निधी मिळाल्याचे ठोस उदाहरण नसल्याचेही कार्यकर्ते सांगत आहेत. अशा परिस्थितीत विनाकारण या विषयात पडून कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न का केला, हा प्रश्न अधिक तीव्र होत आहे.

Local Body Elections : साहेब, उमेदवारी द्या, निवडून आल्याशिवाय राहणार नाही!

जनसेवेपुढे राजकारण आणणे कधीही स्वीकारार्ह ठरू शकत नाही. कॅन्सर रुग्णांसाठी उभारलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला विरोध करून आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठी राजकीय चूक केली असून, याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळ उमटतील, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. किशोर जोरगेवार यांनी मोठी चूक केली अशा पोस्ट सोबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

error: Content is protected !!