Chandrapur’s ‘Five-Year Plan’ on Mungantiwar’s agenda : शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार, वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोडचा प्रस्ताव
Chandrapur चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात नुकत्याच झालेल्या उलथापालथीनंतर आता शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. भाजप आणि उबाठा मित्र नगरसेवकांच्या मदतीने नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव यांची निवड झाल्यानंतर, भाजपचे नेते व राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडला.
शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर मात करण्यासाठी एक ‘संचालन समिती’ स्थापन केली जाणार असून, पुढील ५ वर्षांचा ठोस आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांच्याकडे शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोडचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचे एक चांगले डिझाईन करून प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जमिनीचे अधिग्रहण करून डीपी रोडची कामे मार्गी लावली जातील. शहरातील वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली जाईल. म्हाडाच्या १० हजार गृह प्रकल्पापैकी दोन हजार घरांना केंद्र सरकारीने हिरवी झेंडी दाखवली आहे, ही चंद्रपूरच्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यापूर्वी आपण ऑटोचालक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांच्या नेतृत्वात ऑटोचालकांना अत्यंत माफक दरात घरे उपलब्ध करून दिली होती. आता त्यांच्या पत्नी नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर यांच्या नेतृत्वात अल्प दरात घरे उपलब्ध करून देणार आहोत, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
शहराचा विकास आणि नागरिकांच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी महापालिकेचे उत्पन्न वाढवावेच लागणार आहे. यासाठी काही नव्या बाजारपेठांची निर्मिती केली जाईल. मान्यवरांसह जनतेकडूनही सूचना मागवल्या जातील. तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी ‘टेक्नॉलॉजी बेस’ व्यवस्था निर्माण करून पालिकेच्या कामात गती आणली जाईल असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूरच्या आखाड्यात मुनगंटीवारांचा ‘मुरब्बी’ डाव!
सध्या शहरात एकच मोठे पटांगण आहे. हे लक्षात घेऊन चांदा ग्राऊंडव्यतिरिक्त शहरात ५० ते ७५ एकर जागेवर नवे भव्य मैदान विकसित केले जाईल. रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण आणि संवर्धनासाठी विशेष नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिले.
तत्पूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव यांचा सत्कार केला. भाजपला सत्ता स्थापनेसाठी उद्धव ठाकरे सेनेसह ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले. पत्रकार परिषदेला भाजपचे शहर अध्यक्ष हरीश शर्मा, महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव आणि नगरसेवक राहुल पावडे आदी उपस्थित होते.
जनतेचा सहभाग आणि पट्टेवाटप
शहरातील मान्यवरांपासून ते झोपडपट्टीतील शेवटच्या माणसापर्यंत सर्वांशी चर्चा करून हा विकास आराखडा अंतिम केला जाईल. तसेच, जमिनीचे पट्टेवाटपासाठी मनपा विशेष अभियान राबवणार असून तांत्रिक समस्या तातडीने सोडवल्या जातील. आम्ही शक्तीने तुमच्यासोबत आहोत. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान आणि नियोजनाचा योग्य संगम साधला जाईल असा विश्वासही यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
विकासात भेदभाव करणार नाही
शहराच्या विकासासाठी आता प्रभागनिहाय आराखडा तयार केला जाईल. भाजपचे जे उमेदवार पराभूत झाले, ज्यांना एबी फॉर्म नाकराला परंतु, ते लढले आणि निवडून येऊ शकले नाही, त्यांच्याही प्रभागात विकास कामे केले जातील. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी महापौरांकडे प्रस्ताव दिल्यास त्यांनाही सोबत घेतले जाईल. विकासकामांत कोणताही भेदभाव केला जाणार नाही अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी उपस्थितांना दिली.








