Iran israel war : इराण-इस्रायल युद्धाचा जागतिक बाजारावर भीषण परिणाम; तेलदर झेपावले

iran-israel-war-impact-indian-stock-market-crash-black-day-loss-12-87-lakh-crore : भारतीय शेअर बाजारात ‘ब्लॅक डे’, गुंतवणूकदारांची १२.८७ लाख कोटींची संपत्ती गमावली

New Delhi : इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या युद्धतणावाने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. इराणने खाडी परिसरातील सात देशांमधील तेल व नैसर्गिक वायू प्रकल्पांवर हल्ले चढवल्याने जागतिक ऊर्जा बाजार अस्थिर झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील शेअर बाजारात मोठी घसरण होत ‘ब्लॅक डे’ नोंदवला गेला असून गुंतवणूकदारांची तब्बल १२.८७ लाख कोटी रुपयांची संपत्ती एका दिवसात नाहीशी झाली आहे.

या युद्धपरिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल ११८ डॉलरपर्यंत पोहोचला असून युद्ध सुरू झाल्यापासून त्यात ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. युरोपमधील नैसर्गिक वायूचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले असून एका दिवसात १७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Sudhir mungantiwar : गुढीपाडव्याला कष्टकऱ्याला दिली नवी उभारी; मुनगंटीवारांकडून हातठेला भेट

इस्रायलने पर्शियन आखातातील महत्त्वाच्या ‘साउथ पार्स’ गॅस क्षेत्रावर हल्ला केल्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल हल्ल्यांची तीव्रता वाढवली. कतारमधील रास लाफान एलएनजी प्रकल्प, सौदी अरेबियातील यान्बू येथील सॅमरेफ तेल शुद्धीकरण केंद्र, कुवैतमधील दोन रिफायनरी प्रकल्प आणि अबू धाबीतील गॅस प्रकल्प यांनाही लक्ष्य करण्यात आले. या सलग हल्ल्यांमुळे ऊर्जा क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक असलेल्या साउथ पार्स प्रकल्पावर कतारसोबत संयुक्त मालकी आहे. या प्रकल्पावरील हल्ल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात आणखी अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. इराणमध्ये सुमारे ८० टक्के वीज निर्मिती नैसर्गिक वायूवर अवलंबून असल्याने या हल्ल्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असा इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी दिला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले वाढल्यास मोठे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडींमुळे इस्रायल-इराण संघर्ष आता ‘ऊर्जा युद्धा’च्या दिशेने जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

या जागतिक तणावाचा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. विशेषतः तेल व गॅस क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली असून गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Baramati by election : बारामती पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत मतभेद उफाळले !

ऊर्जा दरवाढीचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होण्याची शक्यता असून महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, कोविड महामारी आणि युक्रेन युद्धानंतर २०२० च्या दशकातील ही तिसरी मोठी ऊर्जा संकटस्थिती ठरू शकते. त्यामुळे येत्या काळात जागतिक आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर या संघर्षाचे गंभीर परिणाम दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.