Nagpur municipal corporation : ‘आपली बस’ १५० कोटींच्या खड्ड्यात; तोट्याच्या ‘ब्रेक’सह महापालिकेचा परिवहन अर्थसंकल्प सादर

NMC Transport Department presented Budget of ₹524.58 Crore : महापालिकेला बसताहेत शहर बससेवेचे आर्थिक चटके, परिवहन विभागाचा ५२४.५८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

Nagpur एकेकाळी नाखुशीनेच एसटी महामंडळाकडून शहर बससेवेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या नागपूर महानगरपालिकेला आता या सेवेचे आर्थिक चटके बसू लागले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात ‘आपली बस’ सेवेमुळे महापालिकेला तब्बल १५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. याच १५० कोटींच्या मोठ्या तुटीसह परिवहन समितीने आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

महानगरपालिकेच्या परिवहन विभागाचा ५२४.५८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासनाने समितीच्या सभापती मंगला खेकरे यांच्याकडे सादर केला.

Nagpur Municipal Corporation : मनपा स्थायी समितीत अध्यक्षांची ‘हुकूमशाही’; काँग्रेस नगरसेवकांचा संताप

परिवहन ही मुळात एक सेवा असल्याने नफ्या-तोट्याचा विचार केला जात नाही, मात्र हा तोटा भरून काढण्यासाठी नवे मार्ग आणि उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्याचा आमचा प्रयत्न राहील, असा विश्वास सभापतींनी यावेळी व्यक्त केला.
उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सध्या ११७ मार्गांवर एकूण ५८० बसेस धावत आहेत. यामध्ये ३८५ ई-बसेस, १५० डिझेल मिडी बसेस आणि ४५ मिनी बसेसचा समावेश आहे.

दररोज सुमारे १.६१ लाख नागरिक या सेवेचा लाभ घेतात. शहरात एकूण १८०० बस थांबे आहेत, मात्र त्यातील केवळ २४४ ठिकाणीच प्रवाशांसाठी निवाऱ्याची सोय आहे. उर्वरित ठिकाणी प्रवाशांना ऊन-पावसात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. धक्कादायक बाब म्हणजे, नवीन अर्थसंकल्पात केवळ १११ नवीन निवारे प्रस्तावित करण्यात आले आहेत. इतर ठिकाणी फक्त फलक (बोर्ड) लावले जाणार असून, ५०० थांब्यांवरील फलकांसाठी ७० लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
परिवहन समितीला ५२४.०७ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे तर एकूण प्रस्तावित खर्च ५२४.०९ कोटी रुपये इतका राहणार आहे.

LPG Crisis : गॅस पुरवठा विस्कळीत; अकोल्यात एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा

आर्टिक्युलेटेड बसेस धावणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर पालिकेला २५ ‘आर्टिक्युलेटेड’ बसेससाठी केंद्र सरकारचा निधी मिळणार आहे. या विशेष बसेससाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांचे संचलन अंतर्गत रिंगरोडवर होईल. या बसचे वैशिष्ट्य म्हणजे याचे चार्जिंग बस थांब्यावरच जलदगतीने होईल आणि एकाच वेळी १३० प्रवासी प्रवास करू शकतील.