Nana Patole criticises BJP, alleging an attempt to push Manuvaad under the guise of women’s reservation : ‘नारी वंदन विधेयक’ नामंजूर झाल्यानंतर विरोधक अॅक्टिव्ह, भविष्यातही विधेयकाला विरोधच
Nagpur लोकसभेच्या निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी मोदी सरकारने आणलेले ‘नारी वंदन विधेयक’ संसदेत फेटाळले गेल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेस आघाडी महिला आरक्षणाच्या विरोधी असल्याचा प्रचार सुरू केला असून, त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. नारी वंदनच्या नावाखाली भाजप मनुवादाचा अजेंडा राबवू पाहत होते, मात्र आम्ही त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले आणि. भविष्यातही हे विधेयक मंजूर होऊ दिले जाणार नाही असा इशारा पटोले यांनी नागपुरात दिला.
नाना पटोले पुढे म्हणाले की, महिला आरक्षणाला काँग्रेसचा कधीच विरोध नव्हता आणि नाही, हे पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, आरक्षण लागू करण्यासाठी लोकसभेच्या जागा वाढवणे आवश्यक असल्याचे सांगून सरकारने दोन्ही विधेयके एकत्र पारित करण्याचा प्रयत्न केला. यासाठी आवश्यक असलेली दोन-तृतीयांश बहुमताची गोळाबेरीज मोदी सरकारला करता आली नाही आणि संख्याबळाअभावी हे विधेयक फेटाळले गेले. आता भाजप आपली अपयश लपवण्यासाठी काँग्रेसवर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपच्या धोरणांवर हल्लाबोल करताना पटोले म्हणाले, काँग्रेसची भूमिका ही संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात जाणाऱ्यांना रोखण्याची आहे. २०२३ मध्येच काँग्रेसने हे विधेयक मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यावेळी जनगणना करून जागा वाढवू असे सांगण्यात आले, मात्र २०२१ ची जनगणना कोरोनाचे कारण सांगून टाळण्यात आली. आता महिला आरक्षण आणि जागा वाढीचे विधेयक एकत्र आणून भाजप राजकारण करत आहे. त्यांना महिला आरक्षणाच्या आडून प्रत्यक्षात मनुवाद आणायचा होता, पण आम्ही संविधानानुसार देश चालावा हीच भूमिका घेतली आहे.”
जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता फक्त सामान्य जनगणना केली जात आहे. ओबीसी आणि इतर मागासवर्गीय महिलांना आरक्षणातून वगळण्याचा घाट घालण्यात आला होता, जो एक प्रकारचा मनुवादच आहे. मोदी आणि अमित शहा यांनी या विधेयकासाठी लहान पक्षांवर दबाव आणला, मात्र ते झुकले नाहीत. आता स्वतःचे अपयश झाकण्यासाठी भाजप चोराच्या उलट्या बोंबा मारत आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी आपला संताप व्यक्त केला. ही आमची वैचारिक लढाई असून ती आम्ही याच पद्धतीने लढत राहू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.







