Chandrashekhar Bawankule criticises Congress, saying women will teach a lesson to those who insult Nari Shakti : नारीशक्तीचा अपमान करणाऱ्यांना महिलाच धडा शिकवतील; काँग्रेसच्या ‘जल्लोषा’चा समाचार
Nagpur लोकसभेत नारीशक्ती वंदन अधिनियमाला विरोध करून काँग्रेसने आपले महिलाविरोधी धोरण पुन्हा एकदा जगासमोर आणले आहे. महिलांना सन्मान देण्याऐवजी त्यांचे राजकीय हक्क हिरावून घेण्याचे पाप काँग्रेसने केले असून, या कृत्याचा बदला देशातील आणि महाराष्ट्रातील ७० कोटी महिला भगिनी घेतल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेसच्या ‘जल्लोषा’चा खरपूस समाचार घेतला आणि आगामी निवडणुकीत याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा दिला.
बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसने विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यानंतर जो जल्लोष केला, तो म्हणजे भारतीय महिलांचा घोर अपमान आहे. हा विषय केवळ राजकारणाचा नसून भारतीय महिलांच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि नारीशक्तीच्या सन्मानाचा आहे. १९९६ पासून देवेगौडा सरकार असो वा अटल बिहारी वाजपेयी यांचे कार्यकाळ, काँग्रेसने चार वेळा महिला आरक्षणाला विरोध करून अडथळे निर्माण केले. ७० कोटी महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व काढून टाकण्याचे काम काँग्रेसने केले असून, हा निर्लज्जपणा उघड झाल्यानंतरही त्यांनी जल्लोष करणे हे अत्यंत संतापजनक आहे. काँग्रेसने केलेले हे पाप महाराष्ट्राची आणि देशाची जनता उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही.
Pune land scam : मुंढवा जमीन घोटाळ्यातील ‘मास्टरमाइंड’ शीतल तेजवानीला जामीन
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जर हे विधेयक सुरळीत पार पडले असते, तर आज महाराष्ट्रात ३३% महिला भगिनी खासदार झाल्या असत्या. मात्र, काँग्रेसने त्यांच्या हक्काची आमदारकी आणि खासदारकी हिरावून घेतली आहे. सरकारचा हेतू केवळ जागा वाढवून महिलांना संधी देणे हाच नव्हता, तर मतदारसंघांच्या पुनर्रचनेतून जनतेला न्याय देणे हा होता. मतदारसंघ मोठे असल्यामुळे अनेकदा खासदारांना भेटणे जनतेला कठीण जाते, जर मतदारसंघ छोटे झाले असते तर खासदारांशी संपर्क वाढला असता आणि लोकांचे प्रश्न वेगाने सुटले असते. या प्रक्रियेमुळे एससी समाजाचे आणि ओबीसींचेही आरक्षण व जागा वाढल्या असत्या, मात्र काँग्रेसने या सर्वांच्या प्रगतीला खिळ घातली आहे.
Vidarbha farmers : शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण’; युवक काँग्रेसची टीका
ज्या २११ खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान करून महिलांच्या हक्कावर गदा आणली आहे, त्या खासदारांना आता पुन्हा कधीच निवडणुका जिंकता येणार नाहीत. तिथल्या महिलाच या पापाचा नाश करतील. काँग्रेसला आता महिलांच्या प्रश्नांवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही आणि आगामी निवडणुकांमध्ये देशातील नारीशक्ती त्यांना नक्कीच धडा शिकवेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.







