mumbai-sextortion-case-woman-cricketer-extorts-63-lakh-businessman-arrested : उद्योगपतीकडून 63 लाख उकळले, महिला खेळाडूसह तिघांना अटक
Mumbai : दक्षिण मुंबईतील एका तरुण उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून तब्बल 63 लाख उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी मुंबई पोलीस गुन्हे शाखेने एका महिला क्रिकेटपटूसह तिच्या भावाला आणि आणखी एका साथीदाराला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून फारखांदा खान हिचे नाव समोर आले असून ती जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात फारखांदा खान, तिचा भाऊ बाझिल अझीझ खान आणि त्यांचा साथीदार इम्तियाज वाणी यांना अटक करण्यात आली आहे. फारखांदा हिला दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली, तर तिच्या साथीदाराला श्रीनगरमधून ताब्यात घेण्यात आले. संबंधित उद्योगपती हा दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरातील रहिवासी असून 2024 साली तो पश्चिम उपनगरात राहत असताना फारखांदाच्या संपर्कात आला होता. ओळख वाढत गेल्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि याचाच गैरफायदा घेत आरोपींनी हा कट रचल्याचा आरोप आहे.
Da hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा; महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ लागू
तपासानुसार, 2024 मध्ये फारखांदाने संबंधित उद्योगपतीकडे पैशांची मागणी केली होती. मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने मोबाईलवरील वैयक्तिक चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या उद्योगपतीने सुरुवातीला 23 लाख रुपये दिले, त्यानंतर आणखी 40 लाख रुपये देण्यात आले. अशाप्रकारे एकूण 63 लाख रुपयांची उकळपट्टी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
तपासात असेही निष्पन्न झाले आहे की उकळलेल्या रकमेपैकी काही रक्कम आरोपी इम्तियाज वाणी यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती, तर काही रक्कम फारखांदाच्या कुटुंबीयांच्या खात्यांमध्ये वळवण्यात आली. दरम्यान, फारखांदाचा भाऊ बाझिल अझीझ खान हाही संबंधित उद्योगपतीला सातत्याने धमकावत होता आणि गंभीर परिणामांची भीती दाखवत होता.
Bypoll voting : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान !
या प्रकरणात आरोपींनी उद्योगपतीला नेमक्या कोणत्या पद्धतीने जाळ्यात अडकवले, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत. तिन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईतील या घटनेमुळे सेक्सटॉर्शनच्या वाढत्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.








