Kharif crop loan target set at ₹682 crore; 1.40 lakh farmers declared ineligible, loan waiver still uncertain : पेरणीपूर्वी आर्थिक अडचणी वाढल्या; बँकांकडून कर्जवाटपाला प्रारंभ
Buldhana खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाचे वास्तव समोर आले असून, एकीकडे बँकांना ६८२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असताना दुसरीकडे तब्बल १ लाख ४० हजार थकबाकीदार शेतकरी या कर्जासाठी अपात्र ठरत असल्याचे चित्र आहे. कर्जमाफी अथवा थकबाकीदार शेतकऱ्यांबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.
पेरणीच्या तोंडावर भांडवलाची गरज असताना अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्याचा मार्ग बंद झाल्याने उधार-उसणवार, खासगी सावकार किंवा महागड्या कर्जव्यवस्थेचा आधार घ्यावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे आणि अग्रणी बँकेचे व्यवस्थापक कौशलेंद्रकुमार सिंग यांच्या उपस्थितीत बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
Fuel price hike : बैलगाडी, गाढव, घोडे अन् सायकल; इंधन दरवाढीचा अनोखा निषेध
बैठकीत पात्र शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ जलद गतीने मिळावा यासाठी विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सुधारित ‘वित्तपुरवठा प्रमाणमान’ नुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यावर भर देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँक अधिकाऱ्यांची बैठक पार पडली असली तरी शेतकरी कर्जमाफीबाबत कोणताही ठोस निर्णय अथवा उल्लेख झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून ३० जूनपर्यंत कर्जमाफीबाबत आश्वासन देण्यात आल्याची चर्चा असली, तरी मे महिना संपत आला आणि पेरणीचा हंगाम सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही जिल्हास्तरावरील यंत्रणांना अद्याप कोणत्याही स्पष्ट सूचना मिळालेल्या नाहीत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात सुमारे १० टक्के वाढ करण्यात आली आहे. खरीप व रब्बी हंगाम मिळून जिल्ह्यासाठी एकूण ९३० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यापैकी ६८२ कोटी रुपये खरीप हंगामासाठी, तर २५८ कोटी रुपये रब्बी हंगामासाठी निश्चित करण्यात आले आहेत.
Devendra fadnavis : मोदी सरकारच्या कामगिरीचं कौतुक करत फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील चलन साठा केंद्राला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कमी प्रमाणात रोकड पुरवठा होत असल्याने बँकिंग सेवांवर परिणाम होत होता. यापूर्वी सुमारे ४० टक्क्यांनी कमी रोकड पुरवठा केला जात असल्याने ग्राहकांना रोख रक्कम उपलब्ध करण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता हा पुरवठा पुन्हा सुमारे ८० टक्क्यांपर्यंत सुरळीत झाल्याने ग्राहकांना बँकांमधून रोकड उपलब्धतेची सेवा पूर्ववत होत असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली आहे.








