BJP fields strong candidates, congress on backfoot in legislative election: डेडलाइन जवळ आली तरी काँग्रेसला उमेदवार सापडेना
Nagpur स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये यंदा ‘नागपूरकरांचा’ मोठा डंका पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या मतदारसंघांतून प्रमुख पक्षांनी दिलेल्या उमेदवारांवर नजर टाकल्यास नागपूरच्या नेत्यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपने नागपूर मतदारसंघातून डॉ. राजीव पोतदार यांना मैदानात उतरवले आहे, तर वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून उद्योजक अरुण लखानी यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे, यवतमाळ मतदारसंघातून शिवसेनेने दुष्यंत चतुर्वेदी यांना तिकीट दिले आहे. विशेष म्हणजे हे तीनही उमेदवार मूळचे नागपूरचेच असल्याने या निवडणुकीत ‘नागपूरकरच भारी’ ठरल्याचे चित्र आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंतची अंतिम मुदत असताना, काँग्रेसला अद्याप आपला उमेदवार ठरवता आलेला नाही. नागपूर मतदारसंघात भाजपचे पारडे जड असल्याने काँग्रेससाठी ही लढाई अत्यंत कठीण मानली जात आहे. त्यातच या निवडणुकीत होणारा प्रचंड आर्थिक खर्च पाहता, काँग्रेसमधून कोणीही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची माहिती समोर येत आहे.
Monsoon update : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी, मुख्यमंत्री कार्यालयाचे महत्त्वाचे आवाहन !
दुसरीकडे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी चाचपणी केली होती. मात्र, उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच काँग्रेसचे काही नगरसेवक गायब झाल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपने आमच्या नगरसेवकांना थेट ५-५ लाख रुपये देऊन पळवले, असा गंभीर आरोप करत वडेट्टीवार आता आपल्या मुलीसाठी उमेदवारी मागण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसत आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीचे भाजप उमेदवार अरुण लखानी यांच्या उमेदवारीमुळे विदर्भातील राजकारण अधिकच रंजक आणि टोकदार झाले आहे. लखानी हे मोठे उद्योगपती असून नागपूरच्या २४ तास पाणी पुरवठ्याचे कंत्राट त्यांच्याकडे होते, मात्र ते दोन वर्षांपूर्वीच शासकीय कंत्राटदारांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.
St bus facility : एसटीचे सर्व स्वच्छतागृह आता मोफत; प्रवाशांना मिळणार स्वच्छ सुखद प्रवास !
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अत्यंत जवळचे संबंध असल्याने लखानी यांना निवडून आणण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यातच आता लखानी यांचे शरद पवार यांच्या कुटुंबाशी थेट कौटुंबिक संबंध निर्माण झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी आणि अरुण लखानी यांच्या मुलाचा साखरपुडा पार पडला असून, ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पक्षाच्या सीमा ओलांडून एक नवी कौटुंबिक आणि राजकीय युती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आता आज दुपारी ३ वाजेपर्यंत काँग्रेस उमेदवार उभा करून काही चमत्कार करते की भाजप-शिवसेना नागपूरकरांच्या जोरावर ही निवडणूक एकतर्फी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








