Four police officers suspended in rajura murder case investigation: तपासातील त्रुटी भोवल्या;
राजुरा प्रकरणातील चुकीच्या तपासामुळे पोलिस दलात खळबळ
Khamgao जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात आढळलेल्या शिरविरहित मृतदेह प्रकरणाच्या तपासात झालेल्या गंभीर त्रुटी आणि अपुऱ्या पडताळणीमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) एका पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
राजुरा शिवारात आढळलेल्या शिरविरहित मृतदेह प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा एलसीबीने यापूर्वी केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी मध्यप्रदेशातील शिवानी कळमेकर हिची हत्या झाल्याचा निष्कर्ष काढत तिचे वडील बापूराव कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांना अटक केली होती. मात्र, काही दिवसांनंतर शिवानी कळमेकर जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
या घटनेनंतर तपासातील त्रुटींबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतर तपास प्रक्रियेतील अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्याचे सांगितले जाते. चौकशी अहवालाच्या आधारे संबंधित पोलिस उपनिरीक्षक आणि तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
Bacchu kadu : राजुरा प्रकरणावर बच्चू कडू आक्रमक; सीबीआय चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा
आधी बदली, नंतर निलंबन
या प्रकरणात एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे तसेच पोलिस अंमलदार अजिस रेहमान परसुवाले, एजाज रफिक खान आणि अमोल रमेश शेजोळ यांची प्रथम नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
शिवानी जिवंत आढळल्याने प्रकरणाला नाट्यमय वळण
ज्या शिवानी कळमेकरच्या हत्येचा दावा पोलिसांनी केला होता, तीच शिवानी जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण तपासाची विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात सापडली. तिच्या कथित हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले बापूराव कळमेकर आणि अजय कळमेकर हे पितापुत्र निर्दोष असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले.
Neet paper leak case : ‘नीट’ प्रकरणातील आरोपी मोटेगावकर यांच्या कथित बेनामी संपत्तीची चौकशी करा
या प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा करत एलसीबीने आरोपींना अटक केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. मात्र, पुराव्यांची पुरेशी शहानिशा न करता कारवाई करण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यामुळे पोलिस विभागाची मोठी नामुष्की झाल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.
अधिकृत माहितीबाबत मौन
दरम्यान, निलंबनाच्या कारवाईबाबत पोलिस विभागाकडून अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण प्रकरणाबाबत गोपनीयता बाळगली जात असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. या कारवाईनंतर चुकीच्या तपासासाठी जबाबदार असलेल्या इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








