व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र ADCC Bank : एडीसीसी बँकेच्या विशेष सभेला उच्च न्यायालयाचा स्थगितीचा फटका

ADCC Bank : एडीसीसी बँकेच्या विशेष सभेला उच्च न्यायालयाचा स्थगितीचा फटका

ADCC Bank’s special meeting hit by a High Court stay order: मूल्यवाढीवर चर्चा करण्यास मनाई, बँकेकडून सभाही रद्द

Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (एडीसीसी) आयोजित विशेष सर्वसाधारण सभा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर रद्द करण्यात आली. बँकेचे संचालक रवींद्र गायगोले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने शेअर मूल्यवाढीच्या विषयावर चर्चा अथवा निर्णय घेण्यास मनाई केली आहे.

न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला. बँकेच्या वैयक्तिक सभासदांसह इतर सहकारी संस्थांच्या क्लास-बी शेअर्सचे मूल्य एक हजार रुपयांवरून दहा हजार रुपये करण्याच्या प्रस्तावावर कोणतीही चर्चा किंवा निर्णय घेऊ नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. सागर लांबट यांनी बाजू मांडली.

Patur Municipal council : पातूर नगरपरिषदेवर काँग्रेस-उद्धवसेना आघाडीचा झेंडा; हिदायतखान रुमखान नगराध्यक्ष

याचिकेनुसार, बँकेने यापूर्वी ३० सप्टेंबर २०२३ रोजी शेअर मूल्यवाढीचा ठराव मंजूर केला होता. मात्र, विभागीय सहनिबंधकांनी तो फेटाळून लावला होता. त्यानंतर सहकार मंत्र्यांनीही हा निर्णय कायम ठेवला होता. या निर्णयाविरोधातील याचिका न्यायालयात प्रलंबित असताना पुन्हा त्याच विषयाचा विशेष सभेच्या विषयपत्रिकेत समावेश करण्यात आल्याबाबत गायगोले यांनी आक्षेप नोंदविला होता.

या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी १ जुलै रोजी ठेवली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, विशेष सर्वसाधारण सभा नियोजित वेळेनुसार घेता येईल; मात्र विषयपत्रिकेतील कलम ५ (ब) अंतर्गत क्लास-बी शेअर्सच्या मूल्यवाढीबाबत कोणतीही चर्चा किंवा निर्णय घेता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे एडीसीसी बँकेतील प्रस्तावित शेअर मूल्यवाढीच्या निर्णयाला तात्पुरता ब्रेक लागला आहे.

Omraje nimbalkar : मध्यरात्री ठाकरे गटाचे दोन आमदार ओमराजे निंबाळकरांच्या भेटीला

दरम्यान, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही विशेष सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आल्याची अधिकृत सूचना जारी केली आहे. ही सभा २१ जून रोजी दुपारी १ वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाहिरात प्रसिद्ध करून सभा रद्द झाल्याची माहिती दिली आहे.

error: Content is protected !!