Bjp’s rajiv potdar, avinash brahmankar register win in legislative council election: विधान परिषद निवडणूक : नागपूर-भंडाराचा निकाल झाला स्पष्ट
Nagpur विधान परिषद निवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना मोठा धक्का बसला असून त्यांचे सर्व दावे फोल ठरले आहेत. नागपूर विधान परिषद मतदारसंघातून भाजप-महायुतीचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राम्हणकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. आता त्यांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी राहिली असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजयोत्सव सुरु केला आहे.
नागपूरमध्ये डॉ. राजीव पोतदार विरुद्ध काँग्रेस-महाविकास आघाडीचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत झाली. भाजप-महायुतीकडे आधीपासूनच मोठे संख्याबळ असतानाही लोंढे मैदानात ठाम होते.
निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेते सुनील केदार यांनी, “नगरसेवकांच्या केवळ भेटीगाठी घेतल्याने मते मिळत नाहीत, निकालात मोठा चमत्कार दिसेल; कोणी कितीही आमिषे दाखवली, तरी मतदान केंद्राच्या आत कोण कोणाला मतदान करेल हे सांगता येत नाही,” असे सूचक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. मात्र, भाजप यावर आधीपासूनच सावध होती. त्यांनी आपल्या सर्व मतदारांना गोव्याला सहलीसाठी पाठवून सुरक्षित केले होते आणि हे सर्व मतदार थेट मतदानाच्या दिवशीच नागपूरमध्ये दाखल झाले. दुसरीकडे, लोंढे यांच्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार नितीन राऊत स्वतः पर्यटनासाठी निघून गेले होते. त्यामुळे या निवडणुकीचा संपूर्ण भार एकट्या लोंढे यांच्यावरच पडल्याचे पाहायला मिळाले. प्रचारातही काँग्रेस नेत्यांमध्ये ताळमेळ किंवा एकत्रित नियोजन दिसले नाही. मतदानाच्या दिवशी लोंढे यांनीसुद्धा, “आपण ही निवडणूक लढवणे हाच काँग्रेसचा विजय आहे,” असे म्हणत निकालापूर्वीच पराभव स्वीकारल्याचे संकेत दिले होते.
Omraje nimbalkar : मध्यरात्री ठाकरे गटाचे दोन आमदार ओमराजे निंबाळकरांच्या भेटीला
दुसरीकडे, भंडारा-गोंदिया मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने आधीच माघार घेतली होती. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अपक्ष उमेदवार नरेंद्र ईश्वरकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. भाजपने मात्र विधानसभा निवडणुकीत नाना पटोलेंना काटेरी टक्कर देणाऱ्या अविनाश ब्राम्हणकर यांना रिंगणात उतरवले होते. हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार, ब्राम्हणकर यांना ३०४ तर नरेश ईश्वरकर यांना अवघी १५२ मते मिळाली आहेत. दोघांमधील मतांची मोठी तफावत पाहता आता केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. भाजप-महायुतीने आधीच विधान परिषदेच्या दोन जागा बिनविरोध जिंकल्या असून, आता नागपूर आणि भंडारा-गोंदियानंतर अमरावतीची जागाही भाजपच जिंकणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
अशी मिळाली मते
राजीव पोतदार (भाजप महायुती) 682
अतुल लोंढे (काँग्रेस महाविकास आघाडी) 130
अवैध मते -11








