Flyover construction near Shivani Airport stalled due to an error by NHAI : शिवणी विमानतळाजवळील उड्डाणपुलाचे काम ठप्प, विमानतळ प्राधिकरणाच्या एनओसीअभावी प्रकल्प रखडला
Akola राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) नियोजनातील त्रुटीचा फटका आता अकोलेकरांना बसत आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता न करता सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपूल प्रकल्पाला भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) ना-हरकत प्रमाणपत्राच्या (NOC) अभावी ब्रेक लागला असून, शिवणी विमानतळाजवळील काम अनेक दिवसांपासून ठप्प आहे.
अकोला औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 (सध्याचा एशियन हायवे-46) च्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्गाची तरतूद करण्यात आलेली नसल्याची गंभीर चूक समोर आली. त्यानंतर ही त्रुटी दुरुस्त करण्यासाठी तयार झालेला रस्ता पुन्हा खोदून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले.
Eknath Shinde Shivsena : ‘शिवसेना पक्ष नव्हे, चळवळ’; अकोला जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्याचा निर्धार
मात्र, हा प्रकल्प शिवणी विमानतळाच्या हद्दीजवळ असल्याने बांधकाम सुरू करण्यापूर्वी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची उंची मंजुरी व एनओसी घेणे कायद्याने बंधनकारक होते. ही मूलभूत तांत्रिक बाब दुर्लक्षित राहिल्याने विमानतळ प्राधिकरणाने कामावर आक्षेप घेतला आणि प्रकल्प अर्धवट अवस्थेत थांबला.
यामुळे औद्योगिक वसाहतीतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. कच्चा व तयार माल वाहून नेणाऱ्या जड वाहनांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असून, वाहनचालक आणि उद्योजकांमध्ये नाराजी वाढत आहे. तसेच अपघातांचा धोकाही वाढल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
ADCC Bank : एडीसीसी बँकेच्या विशेष सभेला उच्च न्यायालयाचा स्थगितीचा फटका
या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक बी. पी. जवादे यांनी सांगितले की, विमानतळ प्राधिकरणाच्या एनओसीअभावी काम थांबले आहे. उड्डाणपुलाची उंची व इतर तांत्रिक बाबींना मंजुरी मिळावी यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठकांचे सत्र आणि पत्रव्यवहार सुरू असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, सुरुवातीच्या नियोजनातील दुर्लक्षामुळे संपूर्ण प्रकल्प रखडला असून त्याचा थेट फटका औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.








