BJP Wins in Bhandara-Gondia; However, the Split in Mahayuti Votes Becomes the Bigger Talking Point : भंडारा विधान परिषद निवडणूक: शिंदे सेनेकडे दाखवले जात आहे बोट
Bhandara भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजप-महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. मात्र, या विजयापेक्षा जिल्ह्यात महायुतीची मते फुटल्याचीच चर्चा अधिक रंगली आहे. आता कोणी दगाबाजी केली याची शोधाशोध सुरू असून, भाजप नेत्यांकडून शिवसेनेकडे (शिंदे गट) बोट दाखवले जात असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस समर्थित नरेश ईश्वरकर यांना शंभर मतांची अपेक्षा असताना त्यांना १५२ मते पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत अविनाश ब्राह्मणकर यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चांगलेच हैराण केले होते. शेवटच्या फेरीपर्यंत निकाल लांबला होता. त्या निवडणुकीतही ब्राह्मणकर आघाडीवर होते, मात्र टपाल (पोस्टल) मतांमुळे पटोले यांना विजयी घोषित करण्यात आले होते. या निकालावर अजूनही अनेकांना शंका आहे. मात्र, याची भरपाई भाजपने विधान परिषदेची उमेदवारी देऊन ब्राह्मणकर यांच्यासाठी केली आणि आता ते आमदार झाले आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता भाजपचा उमेदवार आरामात निवडून येईल असेच दिसत होते. त्यातही काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने लढण्याऐवजी माघार घेतल्याने हा विजय अधिकच सोपा झाला होता. नाना पटोले यांनी अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा जाहीर करून काँग्रेसची लाज राखली होती.
Buldhana Municipal council : लोकप्रतिनिधी अन् प्रशासनात समन्वय ठेवा; आमदारांच्या सूचना
ईश्वरकर आणि ब्राह्मणकर हे दोघेही मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, दोघेही जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने ब्राह्मणकर यांना पक्षात आयात केले होते. या निवडणुकीत ब्राह्मणकर यांना ३०४ तर ईश्वरकर यांना १५२ मते पडली. ईश्वरकर आणि महाविकास आघाडीकडे असलेल्या एकूण मतांच्या तुलनेत ईश्वरकर यांना सुमारे ३० ते ३५ मते अधिक पडली आहेत. त्यामुळे ही अतिरिक्त मते कोणाची, अशी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची ही मते असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीतही ब्राह्मणकर यांच्या विरोधात भाजपच्या एका नेत्याने बंडखोरी केली होती आणि त्याचा फटका भाजपला बसला होता. हे पाहता, ब्राह्मणकर आणि त्यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही असलेल्या एका मोठ्या नेत्याच्या विरोधातील ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
या मतदारसंघातून यापूर्वी विद्यमान राज्यसभा सदस्य व प्रफुल्ल पटेल यांचे कट्टर समर्थक राजेंद्र जैन यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्यांचा भाजपचे परिणय फुके यांनी पराभव केला होता. आता भाजपचे अविनाश ब्राह्मणकर येथून निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजप विजयी झाली असली, तरी महायुतीत मात्र अद्यापही अस्वस्थता आहे हे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, अशाच कुरघोडीच्या राजकारणामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतही भाजपला मोठा धक्का बसला होता; जेव्हा तत्कालीन खासदार सुनील मेंढे यांना काँग्रेसच्या प्रशांत पडोळे यांनी पराभूत केले होते.








