व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Gokul Gite : शिवसेनेचा उमेदवार पाडणाऱ्या गोकुळ गीतेंना एकनाथ शिंदेंचा तातडीचा मुंबई...

Gokul Gite : शिवसेनेचा उमेदवार पाडणाऱ्या गोकुळ गीतेंना एकनाथ शिंदेंचा तातडीचा मुंबई दौऱ्याचा निरोप

gokul-gite-victory-nashik-vidhan-parishad-election-eknath-shinde-calls-mumbai : नाशिकच्या निकालाने राजकारणात खळबळ; विमानही पाठवणार

Nashik : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत झालेल्या धक्कादायक निकालानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी गोकुळ गीतेंना तातडीने मुंबईत बोलावल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यासाठी विशेष विमान पाठवण्याची तयारीही करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यभरातील 17 विधान परिषद जागांच्या निकालांमध्ये महायुतीने 16 जागांवर विजय मिळवत वर्चस्व कायम ठेवले असले, तरी नाशिकचा निकाल सत्ताधारी आघाडीसाठी धक्कादायक ठरला. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाल्याने या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

Vidhan parishad election : विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 16 जागांवर विजय

नाशिक मतदारसंघात एकूण 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीदरम्यान 13 मते अवैध ठरल्याने 605 मते वैध मानण्यात आली. विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी तब्बल 357 मते मिळवत पहिल्याच फेरीत हा कोटा सहज पार केला. दुसरीकडे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना केवळ 248 मते मिळाली. निवडणुकीतील आणखी एक उमेदवार प्रसाद हिरे यांना एकही मत मिळाले नाही.

गोकुळ गीतेंच्या विजयाने नाशिकमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे महायुतीचे संख्याबळ अधिक असल्याचे मानले जात असतानाच अधिकृत उमेदवाराचा झालेला पराभव अनेक प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे. या निकालामुळे स्थानिक पातळीवरील नाराजी, मतांचे विभाजन आणि अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

दरम्यान, निकाल जाहीर होताच एकनाथ शिंदे यांनी गोकुळ गीतेंशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गोकुळ गीतेंना सायंकाळी मुंबईत येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याची तयारीही करण्यात आली आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. गोकुळ गीते यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबतही आता तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Rajeev potdar: भाजपचे मोठे ‘ऑपरेशन’; महाविकास आघाडीची १०० मते फोडत डॉ. राजीव पोतदार ५५२ मतांनी विजयी!

नाशिक विधान परिषद निवडणुकीचा अंतिम निकाल एकूण मतदान : 618 अवैध मते : 13 वैध मते : 605 विजयाचा कोटा : 303 गोकुळ गीते (अपक्ष) : 357 नरेंद्र दराडे (शिवसेना) : 248 प्रसाद हिरे : 0 निकाल : गोकुळ गीते विजयी नाशिकमधील या अनपेक्षित निकालाने केवळ विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढवली नाही, तर महायुतीतील अंतर्गत समीकरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता गोकुळ गीते आणि एकनाथ शिंदे यांची संभाव्य भेट काय नवे राजकीय संकेत देते, याकडे राज्यभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!