Congress launches its campaign for women’s reservation from Nagpur, targeting Prime Minister Modi with 10 lakh postcards and a missed-call drive : खासदारांना फोडून महिला आरक्षण विधेयक पुन्हा आणले जाण्याची काँग्रेसला शंका
Nagpur केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेले महिला आरक्षण विधेयक तातडीने लागू करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेसने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अंतर्गत महिला आरक्षण विधेयक तत्काळ लागू करावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभरातून तब्बल १० लाख पोस्ट कार्ड पाठवून मोठे आंदोलन छेडले जाणार आहे. यावेळी खासदारांना फोडून महिला आरक्षण विधेयक पुन्हा आणले जाण्याची दाट शंका महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी नागपूर येथे व्यक्त केली.
नागपूर येथील आमदार निवास येथून पोस्ट कार्ड पाठवून आणि मिस कॉल देऊन या देशव्यापी महिला आरक्षण मोहिमेचा अधिकृत शुभारंभ अलका लांबा यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना अलका लांबा यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. महिला आरक्षण विधेयकातही जातीनिहाय आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
Weather updates : पुढील ६ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट
आमचे नेते राहुल गांधी सातत्याने या विषयाकडे लक्ष वेधून केंद्र सरकारला जाब विचारत आहेत, मात्र भाजपचे नेते याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत, कारण त्यांना जातीनिहाय आरक्षण नको आहे हेच यातून दिसून येते, असा घणाघात लांबा यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर ३३ टक्के आरक्षणाची विभागणी जातीनिहाय केली जाते, तर मग लोकसभा आणि विधानसभा जागांच्या वाटपात तशी तरतूद का केली जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुळात मतदारसंघांची वाढ (पुनर्रचना) आणि महिला आरक्षण हे दोन पूर्णपणे वेगळे मुद्दे आहेत. मात्र केंद्र सरकार हे दोन्ही मुद्दे एकत्र करून जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महिला आरक्षणाचे विधेयक आधीच सादर झाले असून सर्व विरोधकांनी त्याला मंजुरी दिली आहे, तरीही ते लागू केले जात नाही. उलट विरोधकांनाच महिला आरक्षण विरोधी ठरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचेही लांबा म्हणाल्या.
यावेळी अलका लांबा यांनी इतर राजकीय मुद्द्यांवरूनही सरकारवर तीव्र हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली अयोध्या राम मंदिर उभारणीत ‘चंदा चोरी’ सुरू होती, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. याशिवाय देशभरात गाजलेल्या वैद्यकीय प्रवेशाच्या ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या मुद्द्यावर बोलताना, भाजप सरकार या परीक्षेत पूर्णपणे अनुत्तीर्ण झाले आहे, अशी टीका त्यांनी केली. देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या भाजप सरकारला आम्ही आगामी पावसाळी अधिवेशनात जोरदार जाब विचारणार आहोत, असा इशाराही अलका लांबा यांनी यावेळी दिला.








