व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Missing link row : मुख्यमंत्र्यांच्या ‘खोटारडे, भाडे के टट्टू’ टीकेनंतर विरोधकांचा पलटवार

Missing link row : मुख्यमंत्र्यांच्या ‘खोटारडे, भाडे के टट्टू’ टीकेनंतर विरोधकांचा पलटवार

opposition-hits-back-after-devendra-fadnavis-remarks-missing-link-row : ‘मिसिंग लिंक’ वरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण

Mumbai : राज्यातील मुसळधार पावसानंतर मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात दरड कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर निर्माण झालेल्या वादाने आता विधानसभेत तीव्र राजकीय स्वरूप धारण केले आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “एक कोटी खोटारडे मेल्यानंतर हे लोक जन्माला आले आहेत,” अशी टीका करत त्यांनी महाराष्ट्राची बदनामी सहन केली जाणार नसल्याचा इशाराही दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनीही तीव्र शब्दांत प्रत्युत्तर देत सरकारवर पलटवार केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला. स्वतःची राजकीय टीका स्वीकारू, मात्र महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न कोणाकडूनही खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला शिवसेना ठाकरे गटाचे हा आमदार भास्कर जाधव यांनी तात्काळ उत्तर दिले. “तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकारवर केलेल्या सातत्यपूर्ण आरोपांची आठवण करून दिली. कोविड काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भाजपच्या नेत्यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते, त्यावेळी अशा भाषेचा वापर योग्य होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Rohit Pawar, Ravikant tupkar : पवार-तुपकर एका मंचावर; शेतकरी कर्जमाफीचाही एल्गार?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सरकारवर निशाणा साधला. स्वतःवर खोटे बोलण्याचा आरोप करणारे मुख्यमंत्रीच अनेक वेळा चुकीची विधाने करत असल्याचा दावा त्यांनी केला. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यापासून ते नाशिकमधील पावसाच्या अंदाजापर्यंत अनेक उदाहरणे देत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि “चोराच्या उलट्या बोंबा” अशी टीका केली.

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय दुटप्पीपणाचा आरोप केला. पहाटेच्या शपथविधीपासून भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांनाच नंतर सत्तेत सहभागी करून घेतल्याने महाराष्ट्राचा सन्मान वाढला की अपमान झाला, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या वादात वेगळी भूमिका घेत मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उभारणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाचाही उल्लेख होणे आवश्यक होते, असे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाबाबत बोलताना अजित पवार यांचे नाव न घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर मिसिंग लिंक प्रकल्पाला अजित पवार यांचे नाव देण्याची सूचनाही त्यांनी केली.

Charkha satyagrah : मुक्त व निष्पक्ष निवडणुकांसाठी मलकापुरात काँग्रेसचा ‘चरखा सत्याग्रह’

मिसिंग लिंक प्रकल्पाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता केवळ तांत्रिक किंवा प्रशासकीय राहिलेला नसून तो सत्ताधारी आणि विरोधकांमधील तीव्र राजकीय संघर्षात परिवर्तित झाला आहे. विधानसभेत झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे हा विषय अधिकच तापला असून आगामी काळातही यावरून राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!