tukaram-mundhe-ai-fda-complaint-portal-food-and-medicine-adulteration-maharashtra : भेसळयुक्त अन्न-औषधांविरोधात नागरिकांना थेट तक्रारीची सुविधा
Mumbai : राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे तसेच प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) मोहीम अधिक वेगाने सुरू असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांसाठी मोठा आणि तंत्रज्ञानाधारित उपक्रम सुरू केला आहे. आता कोणत्याही नागरिकाला भेसळयुक्त अन्न, निकृष्ट दर्जाची किंवा बनावट औषधे तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गैरप्रकारांची तक्रार करण्यासाठी लांबलचक अर्ज लिहिण्याची गरज राहणार नाही. फक्त मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तक्रार आपोआप तयार होणार आहे.
या नव्या AI-सक्षम नागरिक तक्रार पोर्टलची माहिती तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली. सुशासन म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नसून नागरिकांसाठी शासन अधिक सुलभ, जलद आणि उत्तरदायी बनवणे, हीच या उपक्रमामागील भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंढे यांनी सांगितले की, नागरिकांनी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत आपली समस्या सांगितली की कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचे स्पष्ट, सविस्तर आणि व्यवस्थित तक्रारीत रूपांतर करते. त्यानंतर ही तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे स्वयंचलितपणे पाठवली जाते. ठरावीक कालावधीत कारवाई न झाल्यास प्रणालीकडून स्वयंचलित एस्कलेशनही केले जाते. तसेच तक्रारीचा संपूर्ण प्रवास नागरिकांना पारदर्शक पद्धतीने ट्रॅक करता येणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या मते, या उपक्रमामुळे नागरिकांचा सहभाग वाढणार असून भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गैरप्रकारांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. “प्रत्येक तक्रार महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे,” असे तुकाराम मुंढे यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
राज्यात अन्नातील भेसळ, बनावट औषधांचा व्यापार तसेच प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात एफडीएकडून सातत्याने धडक कारवाया सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून थेट आणि सोप्या पद्धतीने तक्रारी प्राप्त व्हाव्यात, यासाठी हे AI-आधारित व्यासपीठ विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ होणार आहे.
High Court D : उघड्यावर थुंकणे पडणार महागात! हायकोर्टाचे कडक आदेश
अन्न किंवा औषधांबाबत कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी तातडीने अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रारीसाठी संपर्क:
टोल फ्री क्रमांक: 1800222365
ई-मेल: jc-foodhq@gov.in








