tukaram-mundhe-fda-action-blinkit-zepto-instamart-14-centres-food-safety-maharashtra : तुकाराम मुंढेंचा क्विक-कॉमर्सला मोठा दणका!
Mumbai: महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) क्विक-कॉमर्स कंपन्यांविरोधात मोठी कारवाई करत ब्लिंकिट, झेप्टो आणि इन्स्टामार्टशी संबंधित १४ खाद्य व्यवसाय केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन, अस्वच्छता, तापमान नियंत्रणातील त्रुटी, कीटकांचा प्रादुर्भाव आणि मुदत संपलेले खाद्यपदार्थ साठवून ठेवल्याचे प्रकार तपासणीत समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धडक मोहिमेमुळे क्विक-कॉमर्स क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र एफडीएकडून ऑनलाइन माध्यमातून खाद्यपदार्थांची साठवणूक, विक्री आणि वितरण करणाऱ्या केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. १३ ऑगस्ट रोजी राज्यभरातील तब्बल ८६ केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. नियमांचे पालन करण्यासाठी ६० सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर एका केंद्राचे कामकाज तात्पुरते बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
या कारवाईत निलंबित झालेल्या १४ परवान्यांमध्ये ब्लिंकिटच्या पाच, झेप्टोच्या पाच आणि इन्स्टामार्टच्या दोन केंद्रांचा समावेश आहे. याशिवाय भगवती स्टोअर्स आणि स्विन्स्टा एंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रत्येकी एका केंद्रावरही कारवाई करण्यात आली आहे.
Pm Modi : लहान स्वप्नांना आता मुठमाती; २०४७ पर्यंत विकसित भारताचा निर्धार !
एफडीएच्या तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांची साठवणूक कशा पद्धतीने केली जाते, आवश्यक तापमान राखले जाते का, स्वच्छतेची स्थिती कशी आहे, कीटक नियंत्रणाची व्यवस्था आहे का, तसेच अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता यांची बारकाईने तपासणी करण्यात आली. याशिवाय अन्नसुरक्षेशी संबंधित नोंदी, परवाना दर्शनी भागात प्रदर्शित केला आहे की नाही आणि एफआयएफओ अर्थात ‘फर्स्ट इन, फर्स्ट आउट’ पद्धतीने साठा व्यवस्थापन केले जाते की नाही, याचीही पडताळणी करण्यात आली.
पुण्यातील लोहेगाव येथील झेप्टोच्या एका केंद्रात तपासणीदरम्यान मुदत संपल्यानंतरही काही खाद्यपदार्थ साठवून ठेवल्याचे आढळले. खाद्यपदार्थांच्या वापराची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतरही ते केंद्रात उपलब्ध असल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले. याशिवाय केंद्रातील स्वच्छतेची स्थिती समाधानकारक नसल्याचे, कीटक नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये त्रुटी असल्याचे आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचेही आढळले.
या प्रकरणी सुनावणीदरम्यान कंपनीकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने संबंधित परवाना निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुण्यातील स्विन्स्टा एंट प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवण्यात येणाऱ्या एका केंद्रातही गंभीर त्रुटी आढळल्या. येथे झुरळांचा प्रादुर्भाव असल्याचे तपासणीत समोर आले. गोठवलेल्या खाद्यपदार्थांसाठी आवश्यक असलेली शीतसाखळी म्हणजेच कोल्ड-चेन योग्य पद्धतीने राखण्यात अपयश आल्याचेही आढळले. स्वच्छता आणि कीटक नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्येही कमतरता असल्याचे एफडीएने नमूद केले.
Vijay wadettiwar: जनगणना करताना कशाला हवी कोरोना लशीची माहिती? जनगणना करताय की डेटा गोळा करताय?
मुंबईतील मालाड पश्चिम येथील ब्लिंकिटच्या केंद्रात चिलरचे तापमान निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले. त्यामुळे खाद्यपदार्थ सुरक्षित तापमानात साठवले जात आहेत की नाही, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला. या केंद्रातील सुमारे ४० अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी झालेली नसल्याचे आणि त्यासंबंधीच्या नोंदी उपलब्ध नसल्याचे तपासणीत आढळले. काही कर्मचारी हातमोजे, एप्रन आणि डोक्याचे संरक्षक कव्हर यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने वापरत नसल्याचेही निदर्शनास आले.
केंद्रातील स्टोरेज रॅक तुटलेल्या अवस्थेत होते. विविध खाद्यपदार्थांचा साठा अस्ताव्यस्त असल्याचे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ योग्य पद्धतीने स्वतंत्र ठेवले नसल्याचेही तपासणीत आढळले. मुंबईतील घाटकोपर येथील ब्लिंकिटच्या आणखी एका केंद्रात ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, तापमान नियंत्रण आणि हाऊसकीपिंगमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. एफडीएच्या तपासणीमध्ये या केंद्राला केवळ ४६ टक्के गुण मिळाले. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या आवश्यक निकषांचे समाधानकारक पालन होत नसल्याचे या तपासणीतून स्पष्ट झाले.
मुलुंड आणि गोरेगाव येथील झेप्टोच्या केंद्रांची तपासणी केली असता खाद्यपदार्थांची साठवणूक, तापमान व्यवस्थापन, स्वच्छता आणि अन्न व्यवसायाचा परवाना प्रदर्शित करण्यासंदर्भात त्रुटी आढळल्या. अंधेरीतील इन्स्टामार्टच्या एका केंद्रात तर खाद्यपदार्थांची पाकिटे थेट जमिनीवर ठेवण्यात आल्याचे आढळले. साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसणे, केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी असणे आणि स्वच्छता तसेच तापमान नियंत्रणात त्रुटी असणे, अशा बाबी तपासणीदरम्यान समोर आल्या. एफडीएने केवळ स्टोअरमधील परिस्थितीचीच तपासणी केली नाही, तर खाद्यपदार्थांच्या वितरण प्रक्रियेची आणि डिलिव्हरी ऑपरेशन्सचीही पाहणी केली.
सातारा जिल्ह्यातील कराड येथील ब्लिंकिटच्या केंद्रात एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १२५ डिलिव्हरी रायडर्सची तपासणी केली. या तपासणीत अनेक रायडर्सकडे आवश्यक ओळखपत्रे आणि वैद्यकीय तंदुरुस्तीशी संबंधित नोंदी उपलब्ध नसल्याचे आढळले. डिलिव्हरी बॅग आणि बॉक्सवर एफएसएसएआय परवाना प्रदर्शित करण्यात आलेला नसल्याचेही तपासणीत समोर आले. संबंधित त्रुटी दूर होईपर्यंत कराड केंद्रातून दुचाकीद्वारे खाद्यपदार्थांची डिलिव्हरी बंद ठेवण्याचे निर्देश एफडीएकडून देण्यात आले आहेत.
क्विक-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून काही मिनिटांत खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात असले, तरी वेगासोबत अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता कायम राखणे अत्यावश्यक आहे. साठवणुकीपासून ते ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत खाद्यपदार्थ योग्य तापमानात आणि स्वच्छ वातावरणात ठेवले जात आहेत की नाही, याची जबाबदारी संबंधित अन्न व्यवसायांची आहे. महाराष्ट्र एफडीएच्या या व्यापक कारवाईमुळे अन्नसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे या धडक तपासणी मोहिमेतून अधोरेखित झाले आहे.








