tukaram-mundhe-fda-action-edible-oil-adulteration-loose-oil-ban-warning : भेसळ केल्यास १० लाखांचा दंड अन् जन्मठेपेपर्यंत शिक्षा
Mumbai: खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता खाद्यतेलाकडे मोर्चा वळवला आहे.‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत खाद्यतेलाच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेची तपासणी अधिक कडक करण्यात येणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. सुटे खाद्यतेल विकू नका आणि खरेदीही करू नका, असे आवाहन त्यांनी नागरिक तसेच विक्रेत्यांना केले आहे.
खाद्यतेलाच्या तपासणीत काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन आणि भेसळीचे प्रकार आढळून आल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली. नोंदणी नसलेल्या काही खाद्यतेल उत्पादक कंपन्या आढळल्या असून, खाद्यतेलात अनधिकृत मिश्रण केले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच मुदत संपलेल्या तेलाचे पुन्हा पॅकिंग करून विक्री करण्याचे प्रकारही समोर आल्याचे त्यांनी सांगितले.
मोहरीचे तेल १०० टक्के मोहरीचे तेल म्हणून विकायचे असल्यास त्यामध्ये अनधिकृतपणे इतर तेलाचे मिश्रण करता येणार नाही, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. खाद्यतेलाच्या मानकांबाबत आता स्वतंत्र अनुपालन आदेश काढण्यात येणार असून, उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. या आदेशाच्या कक्षेत खाद्यतेलाशी संबंधित सर्व आस्थापना येणार आहेत. उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेते, किराणा दुकानदार तसेच ऑनलाइन माध्यमातून खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाही नियम लागू असतील. खाद्यतेलाशी संबंधित ४९६ केंद्रीय परवानाधारक नोंदणीकृत असल्याची माहितीही मुंढे यांनी दिली.
खाद्यतेलाची विक्री सुट्या स्वरूपात करता येत नाही, हा नियम आधीपासूनच लागू आहे. खाद्यतेलाची विक्री पॅकेजिंगमध्येच करणे आवश्यक आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी सुटे तेल खरेदी करू नये आणि ग्राहकांनीही सुटे खाद्यतेल घेऊ नये, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे. सुट्या तेलाचा स्रोत, उत्पादनाची तारीख आणि गुणवत्ता याबाबत अनेकदा पुरेशी माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे अशा तेलाच्या वापरामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये तळण्यासाठी वापरलेले तेल वारंवार वापरण्याच्या प्रकारावरही अन्न व औषध प्रशासन लक्ष ठेवणार आहे. एकाच तेलाचा वारंवार वापर करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तळणीचे तेल वारंवार वापरू नये, असा स्पष्ट इशारा तुकाराम मुंढे यांनी हॉटेल व्यावसायिकांना दिला आहे. खाद्यतेलाचे टिन किंवा डबे पुन्हा वापरण्याचे प्रकारही आढळत असल्याचे त्यांनी सांगितले. खाद्यतेलाच्या पॅकेजिंग आणि साठवणुकीसंदर्भातील नियमांचे पालन करणे संबंधित व्यावसायिकांसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Bacchu Kadu : सत्तेत राहून आंदोलनाची वेळ आणू नका, बच्चू कडूंचा अतुल सावेंना इशारा
खाद्यतेलाच्या बाबतीत नियमांचे उल्लंघन करून भेसळ केल्यास कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते. भेसळ आढळल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. तसेच गंभीर प्रकरणांमध्ये सात वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठीही १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे खाद्यतेलाच्या उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Devendra Fadnavis : गडकरींनंतर मुख्यमंत्र्यांचेही जलपर्णीमुक्त अंबाझरीत नौकायान
ग्राहकांनी सुटे खाद्यतेल खरेदी करू नये. पॅकबंद तेल घेताना पॅकेटवरील लेबल, सील, उत्पादनाची तारीख आणि मुदत संपण्याची तारीख तपासावी, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे. तसेच घरातही तळणीसाठी वापरलेले तेल वारंवार वापरू नये. हॉटेल किंवा खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी वारंवार वापरलेले तेल वापरले जात असल्याचे आढळल्यास अशा ठिकाणी खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
खाद्यतेलातील भेसळीचा प्रश्न केवळ ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यापुरता मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळयुक्त खाद्यतेलाविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
___








