Three Innocent Children Burnt to Death, 6 Critical; Cylinder Blast Shakes District Women’s Hospital : ३ निष्पाप बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू, ६ गंभीर; सिलिंडर स्फोटाने जिल्हा स्त्री रुग्णालय हादरले
Amaravti : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात रविवारी मध्यरात्री भीषण अग्नितांडव घडले. अचानक झालेल्या सिलिंडरच्या स्फोटानंतर रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन निष्पाप चिमुकल्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. या थरारक घटनेने संपूर्ण अमरावती शहर हादरले असून रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या स्फोटानंतर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट वेगाने पसरल्याने रुग्णालयातील एनआयसीयू विभागात दाखल असलेल्या तब्बल ३६ बालकांचा जीव थेट धोक्यात सापडला होता. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत ३६ बालकांना सुरक्षित बाहेर काढले, मात्र दुर्दैवाने ३ बालकांचा यात जीव गेला. आगीत गंभीर भाजलेल्या ६ बालकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने गंभीर दखल घेतली असून आरोग्य प्रशासनाला या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या भीषण दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्री आणि सचिवांना आजच अमरावतीत दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.
Sunil Deshmukh : नेतेच ठरताहेत जनतेचे शत्रू; माजी पालकमंत्री सरकारवर बरसले!
आगीत प्राण गमावलेल्या मृत बालकांच्या पालकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून सर्व जखमी बालकांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेवर तीव्र दुखः व्यक्त केले असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात धाव घेतली आहे.








