व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अनिल सोले नियंत्रणाबाहेर; बंडखोरीवर ठाम असल्याने बावनकुळे हतबल

अनिल सोले नियंत्रणाबाहेर; बंडखोरीवर ठाम असल्याने बावनकुळे हतबल

पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षांना मध्यस्थीचे आवाहन, सेनाड नरमले

Nagpur विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत पेटलेला वणवा आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अनिल सोले यांनी थेट बंडखोरीचे निशाण फडकावल्याने भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोले यांनी माघार घेण्यास सपशेल नकार देत चक्क प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाची तारीखच जाहीर केल्याने महायुतीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. या गंभीर बंडखोरीमुळे राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील पूर्णपणे हतबल झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, रमण सेनाड यांनी गडकरींच्या शब्दाचा मान ठेवत अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

नागपूर पदवीधरमधून अनिल सोले यांनाच उमेदवारी मिळावी, अशी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची व निष्ठावंत कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती. सोले यांनी यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असल्याने त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी जोर धरत होती. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या आग्रहाखातर सुधाकर कोहळे यांचे नाव पुढे रेटून उमेदवारी निश्चित केल्याची जोरदार चर्चा आहे.
या डावलण्याने दुखावलेल्या अनिल सोले यांनी अपक्ष अर्ज दाखल करत भाजपला पहिला मोठा धक्का दिला. त्यांना मनवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट सोले यांच्या घरी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोले यांनी कोणालाही दाद न देता आपला फोनच बंद करून ठेवला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पक्षाचा त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.

गडकरींच्या घराशेजारीच अनिल सोले थाटणार प्रचार कार्यालय; आता माघार नाहीच

बंडखोरी मागे घेण्याऐवजी सोले यांनी भाजपचेच दुसरे माजी आमदार गिरीश व्यास यांच्या बडकस चौकातील कार्यालयात आपले मध्यवर्ती प्रचार कार्यालय उघडण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावरून या उद्घाटनाचे निमंत्रण कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात आले असून, आता सोले कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाहीत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या सर्व राजकीय नाट्यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली हतबलता व्यक्त केली. पक्षातील कार्यकर्त्यांनी बंडखोरी करू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अनिल सोले अर्ज भरणार नाहीत असे वाटले होते, पण त्यांनी अर्ज दाखल केला. पक्ष हा आईसारखा असतो. राजकारणात कधी संधी मिळते तर कधी थांबावे लागते.

मुनगंटीवारांचा एक फोन अन् वर्षांपासून रखडलेली शिवणीची एसटी धावू लागली

२०१९ मध्ये मलाही पक्षाने थांबवले होते, मात्र २०२४ मध्ये पुन्हा संधी दिली. सोले हे प्रगल्भ नेते आहेत, त्यांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेऊ नये, अशी विनंती बावनकुळे यांनी केली.
तसेच, सोले यांनी ऐकले नाही तर त्यांच्यावर काय कारवाई करायची, याचा निर्णय आता थेट प्रदेशाध्यक्ष घेतील, असे सांगत बावनकुळे यांनी पक्षाध्यक्षीय पातळीवर चेंडू टोलावला आहे. सोले यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नागपूर पदवीधरची निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि बिकट बनली आहे.

 

error: Content is protected !!