खा. डॉ. किरसान यांच्या पाठपुराव्याला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा प्रतिसाद
Gadchiroli: धानोरा तालुक्यातील इवली- गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त असलेल्या नागरिक आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या महामार्गाच्या ४६.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व सुधारणेसाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ४५.७९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, दुर्गम भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० हा परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने प्रवाशांसह वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः अवजड वाहनांची सातत्याने होणारी वाहतूक आणि रस्त्याची खालावलेली गुणवत्ता यामुळे अपघातांचा धोका तसेच प्रवासाचा त्रास वाढला होता. या समस्येची गांभीर्याने दखल घेत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली होती.
या संदर्भात त्यांनी १८ जून रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला पत्र पाठवून संबंधित रस्त्याच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री अजय टमटा यांनी खासदार डॉ. किरसान यांना पत्राद्वारे ४५.७९ कोटी रुपयांच्या कामाला मंत्रालयाने मंजुरी दिल्याची माहिती दिली.
या निधीतून इवली-गडचिरोली महामार्गाच्या ४६.५० किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण आणि आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता उंचावण्याबरोबरच वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. धानोरा तालुक्यासह परिसरातील ग्रामीण व दुर्गम भागांना जोडणाऱ्या या मार्गामुळे नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
हिवाळी अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचेच; कालावधीवरून विजय वडेट्टीवार संतप्त
या महामार्गावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत होता. आता निधी मंजूर झाल्याने प्रत्यक्ष कामाला लवकर सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.नखासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांमुळे या महत्त्वपूर्ण रस्ते प्रकल्पाला आर्थिक मंजुरी मिळाल्याने परिसरातील दळणवळण, सुरक्षित प्रवास आणि विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे.








