yuv-manthan-planted-questions-amit-thackeray-attack-devendra-fadnavis-paper-leak : अमित ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती हल्ला
Nagpur : देशभरातील तरुणांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून युवा वर्गाशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘युवा मंथन’ कार्यक्रमावर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे. या कार्यक्रमात विचारण्यात आलेले सर्व प्रश्न आधीच ठरवून ठेवलेले अर्थात ‘प्लँटेड’ होते आणि जेन झी तरुणांना प्रत्यक्ष प्रश्न विचारण्याची संधीच देण्यात आली नाही, असा दावा अमित ठाकरे यांनी केला.
भाजप सरकारचा हा संपूर्ण खटाटोप केवळ तरुणांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी सुरू असल्याचा आरोप करत, केवळ कार्यक्रम आणि इव्हेंटच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधल्याचा देखावा करून त्यांच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण होणार नाही, असा घणाघातही त्यांनी केला. जंतर-मंतरवरील आंदोलन आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे देशातील तरुणांच्या प्रश्नांकडे राजकीय पक्षांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विविध राजकीय नेते युवा वर्गाशी संवाद साधताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘युवा मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमातील प्रश्नोत्तराच्या सत्रावरच अमित ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “युवा मंथनमध्ये विचारण्यात आलेले सर्व प्रश्न प्लँटेड होते. जेन झी तरुणांना खरे प्रश्न विचारूच दिले गेले नाहीत,” असा आरोप त्यांनी केला. तरुणांच्या समस्या समजून घेण्याऐवजी निवडणुकीच्या राजकारणासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचा दिखावा केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
Mahayuti Politics : महायुतीत ‘ऑल इज वेल’चा दावा, पण पडद्यामागे कुरबुरींचा धूर?
दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असलेले अमित ठाकरे यांनी रविभवन येथे माध्यमांशी संवाद साधताना केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रासह देशभरात सातत्याने समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवरून त्यांनी सरकारच्या प्रशासकीय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. MPSC ने अन्न व औषध निरीक्षकांची परीक्षा रद्द केल्याचा दाखला देत, “या सरकारला एक साधी परीक्षा नीट घेता येत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले. केंद्र सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदे आणण्याचे आणि भविष्यात अशा घटना होणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीत पेपरफुटीच्या घटना सुरूच असल्याचा आरोप अमित ठाकरे यांनी केला. “केवळ कायदे करण्याच्या घोषणा किंवा मोठमोठे कार्यक्रम घेऊन प्रश्न सुटणार नाहीत. विद्यार्थ्यांना परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात देता आली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
Wadettiwar U Turn : सुप्रिया सुळे यांच्याबाबत आधी वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, नंतर घेतला यू-टर्न
सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे आतापर्यंत २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर दावाही अमित ठाकरे यांनी केला. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींची जबाबदारी सरकारने स्वीकारून ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. NEET पेपरफुटीच्या कथित प्रकरणाचा संदर्भ देत अमित ठाकरे यांनी नागपुरातील विद्यार्थिनी अंकिता हिच्या आत्महत्येचा मुद्दाही उपस्थित केला. पेपरफुटीच्या त्रासाला कंटाळून अंकिताने आत्महत्या केल्याचा दावा करत, तिच्या कुटुंबीयांच्या दुःखाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
“सत्ताधारी भाजपमधील एकही मंत्री किंवा नेता अंकिताच्या दुःखी कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेला नाही,” असा दावा करत अमित ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. अंकिताच्या कुटुंबाची सध्याची परिस्थिती अत्यंत कठीण असल्याचे सांगत, सरकारने पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पेपरफुटीच्या प्रकरणानंतर एका मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला असला, तरी केवळ राजीनामा घेऊन सरकारची जबाबदारी संपत नाही, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली.
Vijay Wadettiwar : सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा वडेट्टीवारांचा सनसनाटी दावा
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार यासाठी सरकारने दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. पीडित कुटुंबांना मदत, दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. आपतरुणांना आपलेसे करण्यासाठी केवळ मोठे कार्यक्रम, संवाद सत्रे आणि इव्हेंट आयोजित करून उपयोग नाही. तरुणांना रोजगार, पारदर्शक परीक्षा व्यवस्था आणि सुरक्षित भवितव्य हवे आहे. त्यामुळे सरकारने प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा, असा सल्ला अमित ठाकरे यांनी दिला. \‘युवा मंथन’ कार्यक्रमातील कथित ‘प्लँटेड’ प्रश्नांवरून अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारला लक्ष्य केल्याने नागपूरच्या राजकारणातही या आरोपाची चर्चा सुरू झाली आहे. आता सरकारकडून या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.
__








