ashok-kharat-ed-income-tax-raid-benami-transactions-nashik-news : कोट्यवधींच्या बेनामी व्यवहारांचे धक्कादायक पुरावे उघड
Nashik : भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली असून अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभागाने टाकलेल्या संयुक्त धाडीत कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहारांचे धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. तपास यंत्रणांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत फसवणूक आणि खंडणीच्या माध्यमातून उभारलेला पैसा विविध मालमत्तांमध्ये गुंतवून मोठे आर्थिक जाळे तयार केल्याचे स्पष्ट होत आहे. या कारवाईमुळे नाशिकसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
धाडीदरम्यान सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर खुलासा म्हणजे खरातच्या निवासस्थानी मालमत्तांच्या ‘कच्च्या नोंदी’ असलेली कागदपत्रे सापडली आहेत. अधिकृत नोंदणी न करता केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार करून अनेक जमिनी स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे प्राथमिक पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. करचुकवेगिरी करण्यासाठी आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी अधिकृत व्यवहार टाळून अशा कच्च्या पावत्यांचा वापर केल्याचेही उघड झाले आहे.
तपासादरम्यान सुमारे १० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या मालमत्तांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये काही व्यवहार शेल कंपन्यांच्या माध्यमातून फिरवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या कंपन्यांच्या साहाय्याने आर्थिक व्यवहारांची साखळी लपवण्याचा प्रयत्न केल्याचे संकेत मिळत असून बँक खाती, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि आयकर विवरणपत्रांची सखोल तपासणी सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आणखी गुन्हे नोंदवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, अशोक खरातविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही गुन्हे दाखल असून ती अद्याप फरार असल्याची माहिती समोर येत आहे. तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू असून शुक्रवारी ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे. फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितल्याने न्यायालयाने ही मुदत वाढवून दिली आहे.
Shikshak Bank : शिक्षक बँकेतील चार दिग्गज संचालक अपात्र; पद खारीज करण्याचे आदेश
या संपूर्ण प्रकरणामुळे अशोक खरातविरोधातील तपास अधिक तीव्र झाला असून आर्थिक गैरव्यवहारांचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांनी आवळलेला फास अधिक घट्ट होत असल्याने पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








