mahayuti-mlc-election-seat-sharing-bjp-shivsenna-eknath-shinde-devendra-fadnavis : विधानपरिषद जागावाटपावर महायुतीत खदखद!
Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्येच जागावाटपावरून मोठा तणाव निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. बहुतेक जागांवर महायुतीत एकमत झाल्याची माहिती असली तरी एका जागेवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अद्यापही तिढा कायम आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत सात जागांवर ठाम दावा केला आहे. शिवसेनेकडून यापूर्वीच्या पाच जागांसह नव्याने ताकद वाढलेल्या आणखी दोन जागांवर दावा करण्यात आल्याचे समजते. यासाठी शिवसेनेने भाजपसमोर अधिकृत प्रस्तावही ठेवला आहे. मात्र भाजपकडून शिवसेनेला केवळ तीन ते चार जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. त्यानंतर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र अद्याप एका जागेवर अंतिम सहमती झालेली नाही.
Buldhana politics : जिल्हा राजकारणाचे ‘पॉवर सेंटर’ बनले जळगाव जामोद
याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत बहुतांश जागांवर तोडगा निघाल्याची माहिती समोर आली असली तरी शिवसेनेने आणखी एका जागेवर दावा कायम ठेवला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनीही एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे.
आता या संपूर्ण वादावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय ठरणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Water crisis : धरण उशाशी, तरी गावांवर जलसंकट; देऊळगाव राजात पाणीटंचाईवरून प्रशासनावर टीका
महायुतीमध्ये सुरुवातीला ठरलेल्या प्राथमिक फॉर्म्युल्यानुसार भाजप १२ जागा, शिवसेना ३ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागा लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर काही पारंपरिक जागांमध्ये बदल करण्याबाबत चर्चा सुरू झाली. विशेषतः रायगड जिल्ह्यात शिंदे गटाकडून स्वतंत्र उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा पेच अधिकच वाढला आहे.
Chikhli municipal council : भूखंड वाटप, पाणीपुरवठा, फ्लेक्सबाजीसह विविध विषयांवर खडाजंगी
दरम्यान, ठाणे विधान परिषद जागेवरूनही भाजप आणि शिवसेनेत स्पर्धा वाढल्याचे दिसत आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाणे जागेवर भाजपचा ठाम दावा असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपचे ४४४ नगरसेवक असून शिवसेना आणि जिजाऊ संघटनेचे ३४६ नगरसेवक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे संख्याबळाच्या आधारावर ही जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महायुतीतील या जागावाटपाच्या संघर्षामुळे विधान परिषद निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी आघाडीत अंतर्गत नाराजी वाढल्याचे दिसून येत आहे. एका जागेसाठी सुरू असलेली ही रस्सीखेच आगामी राजकीय समीकरणांवरही मोठा परिणाम करू शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
_








