व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bal mane : ‘कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदे सेनेची सुपारी घेऊन काम...

Bal mane : ‘कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदे सेनेची सुपारी घेऊन काम केले’

bal-mane-attacks-vinayak-raut-after-expulsion-from-uddhav-thackeray-shiv-sena-konkan-politics : बाळ मानेंचा विनायक राऊतांवर घणाघाती हल्लाबोल

Mumbai : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादाला आता नवे वळण मिळाले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार असताना उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या बाळ मानेंनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. विनायक राऊत यांनी आपल्याला ‘गद्दार’ म्हटल्याचा उल्लेख करत बाळ मानेंनी त्यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली असून कोकणातील शिवसेना कमकुवत करण्यासाठी राऊत जबाबदार असल्याचा दावा केला आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्यात थेट लढत अपेक्षित होती. मात्र मतदानापूर्वीच बाळ मानेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली. या निर्णयामुळे ठाकरे गटात तीव्र नाराजी निर्माण झाली आणि पक्षाने बाळ माने यांची तात्काळ हकालपट्टी केली.

Amravati shivsena: अमरावती उद्धवसेनेत फूट, जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, शिंदेसेनेत दाखल होण्याची चर्चा

हकालपट्टीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाळ माने म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे १९९० पासून कौटुंबिक संबंध आहेत. नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क साधून निवडणुकीतील वास्तव परिस्थिती समजावून सांगितली. अवघ्या ५५ मतांच्या आधारावर निवडणूक लढवणे राजकीयदृष्ट्या योग्य ठरणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे परिस्थितीचा विचार करूनच आपण अर्ज मागे घेतल्याचा दावा त्यांनी केला.

बाळ माने यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचे सांगत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांनी आपल्याला नेहमीच प्रेम दिल्याचे नमूद केले. मात्र पक्षातून हकालपट्टी जाहीर झाल्यानंतर विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Legislative election: अमरावती विधान परिषद निवडणूक : प्रशांत महल्ले यांची माघार; पोटे-देशमुख-विश्वकर्मा यांच्यात त्रिकोणी लढत

विनायक राऊत यांच्यावर टीका करताना बाळ माने म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना आपली उमेदवारी नको होती. त्यावेळीही काही लोकांसोबत त्यांची ‘सेटिंग’ होती. डोमकावळ्यासारखे येऊन टीका करण्याचा त्यांना अधिकार काय, असा सवाल त्यांनी केला. कोकणात शिवसेनेची वाट लावण्याचे काम विनायक राऊत यांनीच केले असून पदाधिकाऱ्यांची पत्रे देण्यासाठीही पैसे घेतले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

यावेळी बाळ माने यांनी पालघर लोकसभा निवडणुकीच्या काळात एका हॉटेलमध्ये मोठा व्यवहार झाल्याचा आरोप करत त्यामध्ये कोणाला किती पैसे मिळाले हे जनतेसमोर सांगावे, असे आव्हानही विनायक राऊत यांना दिले. तसेच शिंदे गटाकडून आपल्याविरोधात सुपारी घेऊन विनायक राऊत काम करत असल्याचा आरोप करत ते शिंदे सेनेचे ‘भाट’ बनल्याची टीकाही त्यांनी केली.

संजय राऊत यांनी विधान परिषद निवडणुकीत १५० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा आरोप केल्यानंतर त्यावरही बाळ माने यांनी प्रतिक्रिया दिली. आपण अर्ज का मागे घेतला याची स्पष्ट कारणे दिली आहेत. महाविकास आघाडीमध्ये एकमत नव्हते आणि निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक मतसंख्याही नव्हती. केवळ पराभव पत्करण्यासाठी निवडणूक लढवणे आपल्या राजकीय भविष्यासाठी योग्य नव्हते, असे त्यांनी सांगितले.

Legislative election : काँग्रेसला आणखी एक धक्का; वर्धेतून भाजपचे अरुण लखानी अविरोध, नागपुरात निवडणूक अटळ

बाळ माने यांनी पुढे दावा केला की, अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीबाबत पक्ष नेतृत्वाला माहिती दिली होती. उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संवाद होऊ शकला नाही, मात्र इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली होती. दरम्यान, दुसऱ्या बाजूला महायुतीकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सातत्याने संपर्क आणि दबाव वाढत होता. या सर्व परिस्थितीचा विचार करूनच आपण माघार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बाळ माने यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर त्यांच्यासोबत भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे दिसून आल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चांना उधाण आले आहे. हकालपट्टीनंतर ते नितेश राणेंसोबत मुंबईत आल्याची माहिती समोर आली असून येत्या काही दिवसांत त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही ते लवकरच भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधान परिषद निवडणुकीतील या घडामोडींमुळे कोकणातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले असून बाळ माने, विनायक राऊत आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष पुढील काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

___

error: Content is protected !!