ahilyanagar-bhondubaba-rajendra-gadge-arrest-fraud-magic-remedies-case : मंत्रोच्चाराने आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे अटकेत
Sangamner : मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचे खोटे दावे करत सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे याला संगमनेर पोलिसांनी अटक केली असून ‘दत्तधाम सरकार’ या नावाने सुरू असलेल्या कथित दरबाराचा मोठा भांडाफोड झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या फसवणुकीचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात राजेंद्र बापू गडगे याने स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे भासवून ‘दत्तधाम सरकार’ नावाने यूट्यूब चॅनल आणि दरबार सुरू केला होता. या माध्यमातून तो कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर मंत्रशक्तीने उपचार करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देतो तसेच घरगुती अडचणी दूर करतो, असे भ्रामक दावे करत होता. या दाव्यांवर विश्वास ठेवून अनेक नागरिक त्याच्याकडे जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
Tcs nashik case : फरार निदा खानचा शोध सुरूच, लैंगिक शोषण व कथित धर्मांतर प्रकरणाने संताप वाढला
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, समस्यांचे निराकरण करण्याच्या नावाखाली हा भोंदू भक्तांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होता. अकरा हजारांपासून ते एकावन्न हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याचे समोर आले असून उपचाराच्या नावाखाली पालापाचोळ्याचे औषध देऊन लोकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा आरोप आहे. गेल्या दहा वर्षांत शेकडो लोकांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे अशा पाच जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
Women reservation : विरोधकांचा आक्षेप, परिसीमन व जातीय आरक्षणाच्या मागण्यांमुळे गणित बिघडलं
आरोपींवर जादूटोणा विरोधी कायदा, आयटी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज कायदा, मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बनावट व्हिडिओ तयार करून लोकांची दिशाभूल केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे करत असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






