₹4.36 crore relief through the Chief Minister’s Medical Assistance Fund; 536 patients in Akola benefited : जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि जलद निपटाऱ्यामुळे लाभ
Akola शासनाच्या विविध आरोग्य योजनांतून मदत न मिळालेल्या गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रभावी ‘आधार’ ठरत असल्याचे चित्र अकोल्यात दिसून येत आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील ५३६ रुग्णांना तब्बल ४ कोटी ३६ लाख ५४ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सहायता निधीच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जिल्हा कक्षाची स्थापना, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस करणे आणि अर्जांचा तातडीने निपटारा यामुळे मदत वितरणाची गती वाढली आहे. तसेच सामंजस्य करार आणि क्राउड फंडिंगच्या माध्यमातून सामाजिक संस्था, धर्मादाय रुग्णालये आणि दाते यांचे सहकार्य मिळत आहे.
या सुधारित यंत्रणेमुळे पारदर्शकता वाढली असून पात्र रुग्णांना वेळेत मदत मिळत आहे. कॉक्लियर इम्प्लांट (२ ते ६ वयोगट), हृदय, यकृत, किडनी व फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो, हिप व गुडघा शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार (केमोथेरपी/रेडिएशन), डायालिसिस, अपघातग्रस्त, नवजात शिशूंचे आजार तसेच भाजलेल्या रुग्णांसह एकूण २० गंभीर आजारांसाठी या निधीतून सहाय्य दिले जाते.
कर्करोग उपचारासाठी सामंजस्य करार
बालकांच्या कर्करोग उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सीएसआर निधीतून आर्थिक साहाय्य उपलब्ध होणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालकांना दर्जेदार उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
Vijayraj Shinde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीतून विजयराज शिंदे यांची विधानपरिषदेसाठी फिल्डींग?
अधिकाधिक रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
अकोला जिल्हा : ५३६ लाभार्थी
एकूण मदत : ४.३६ कोटी रुपये
राज्यभर लाभार्थी : ४०,७७६ रुग्ण
राज्यातील एकूण मदत : ३३३.०६ कोटी रुपये








