The arrogant owner who dragged a Naib Tehsildar with a JCB has been sent to jail : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कडक ॲक्शन मोडवर, कुही तालुक्यातील घटना
Nagpur कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा बोरी (नाईक) येथे अवैध उत्खनन पकडण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्याच्या जिवावर बेतणाऱ्या जेसीबी चालक-मालकावर अखेर कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे. अवैध मुरुम उपसा करणाऱ्या जेसीबीला रंगेहात पकडणारे नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना चक्क जेसीबीने ३ किलोमीटरपर्यंत फरफटत नेणाऱ्या आयुर थोटे याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ मे च्या रात्री मौजा बोरी येथे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच नायब तहसीलदार निकाळजे यांनी धाडस दाखवत घटनास्थळ गाठले होते. कारवाईसाठी ते जेसीबीवर चढले असता, चालक आणि मालक असलेल्या आयुर थोटे याने गाडी थांबवण्याऐजी ती वेगाने पळवायला सुरुवात केली. निकाळजे यांनी जीव मुठीत धरून गाडी थांबवण्यास सांगितले, मात्र आरोपीने बेदरकारपणे जेसीबी चालवून त्यांच्या जीविताला प्रत्यक्ष धोका निर्माण केला. ३ किलोमीटरच्या या थरारानंतर महसूल विभागाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली.
Sanjay raut : महिलांच्या अंगावरील जखमा पाहून संजय राऊत संतापले !
या थरारक घटनेत नायब तहसीलदार निकाळजे यांनी दाखवलेल्या धैर्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विशेष कौतुक केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची बैठक बोलावून जिल्ह्यात अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड उपस्थित होते.
Nagpur municipal corporation : बसपा नगरसेविका हर्षला जयस्वाल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार
आरोपी आयुर थोटे याला वेलतूर पोलिसांनी ६ मे रोजी बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ६२, १३२, २२१, १२१(१), १०९ आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या अशा गुन्हेगारांविरुद्ध आता प्रशासनाने कठोर पवित्रा घेतल्याने अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.








