Public outrage on Democracy Day; strong resentment over the absence of officials : पाणी, स्वच्छता, वीज अपव्ययावर थेट सवाल; प्रशासनाला नागरिकांचा जाब
Malkapur अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने आयोजित ‘लोकशाही दिना’त शहरातील विविध नागरी समस्यांवर नागरिकांनी थेट आवाज उठवत प्रशासनाला जाब विचारला. पाणीपुरवठ्याची अनियमितता, साफसफाईतील त्रुटी, स्ट्रीट लाईटचा अपव्यय तसेच अधिकाऱ्यांची अनुपस्थिती या मुद्द्यांनी बैठकीत ठळकपणे लक्ष वेधले.
तहसील कार्यालयात २० एप्रिल रोजी तिसऱ्या सोमवारी हा ‘लोकशाही दिन’ नायब तहसीलदार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ग्राहक मंचाचे अध्यक्ष दामोदर शर्मा, वरिष्ठ सल्लागार हरिभाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात दामोदर शर्मा यांनी लोकशाही दिनाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी निर्भयपणे आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन केले. हरिभाऊ पाटील यांनी नगर परिषद कार्यपद्धतीवर थेट प्रश्न उपस्थित करत शहरातील साफसफाई व पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले. शहरात लावल्या जाणाऱ्या ध्वज, फलक व जाहिरातींसाठी संबंधित विभागाची परवानगी घेतली जाते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बैठकीत नळपाणी पुरवठ्याची अनियमितता हा प्रमुख मुद्दा ठरला. कोणत्याही ठराविक वेळापत्रकाशिवाय पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. खामगावसारख्या शहरांत पाणीपुरवठ्याची माहिती मोबाईल किंवा वृत्तपत्रांद्वारे दिली जाते, तर मलकापूरमध्ये अशी सुविधा का नाही, हा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
याशिवाय बसस्थानकावरील भ्रमणध्वनी सेवा बंद असणे, स्ट्रीट लाईट वेळेवर बंद न केल्याने होणारा वीज अपव्यय यावरही चर्चा झाली. पंकज मोरे यांनी दुकानदारांकडून पक्के बिल दिले जात नसल्याची तक्रार करत त्यासंदर्भातील व्हिडिओ पुरावा सादर केला. तसेच महिलांच्या स्वच्छतागृहांच्या समस्येकडेही लक्ष वेधण्यात आले.
Malegaon blast case : मालेगाव स्फोट प्रकरणात चार आरोपींना मोठा दिलासा !
दरम्यान, या बैठकीसाठी १७ विभागांना निमंत्रण देण्यात आले होते; मात्र केवळ दोनच विभागांचे अधिकारी उपस्थित राहिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती अनिवार्य करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला.








