Villagers protest against the functioning of the Gram Panchayat; questions raised over water, funds, and transparency : नागरिकांच्या उपोषणाचा दुसरा दिवस; चौकशीशिवाय माघार नाही, ग्रामस्थ ठाम
Dusarbid ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहारांविरोधात ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही तीव्र होत असून, गावातील वातावरण तापले आहे. २० एप्रिलपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, ग्रामपंचायतीच्या आवक-जावक नोंदींमध्ये पारदर्शकता नसून घरपट्टी व नळपट्टी वसुलीतील रकमेचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याशिवाय आठवडी बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा गैरवापर, बनावट बिले तयार करून निधी वळविणे तसेच विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
Malegaon blast case : मालेगाव स्फोट प्रकरणात चार आरोपींना मोठा दिलासा !
पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी हा आंदोलनाचा मुख्य मुद्दा ठरत आहे. नवीन नळजोडणीच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे वसूल करूनही अनेक भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः वॉर्ड क्रमांक १ व २ मध्ये गेल्या दोन वर्षांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी.डी. घुगे व आर.एस. पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, प्रस्तावित चौकशी समितीत स्थानिक अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने ती निष्पक्ष राहणार नाही, असा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी ही अट नाकारली.
संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा उपसरपंच अशोक गुंजाळ, माजी उपसरपंचपती शेख तौफिक, गजानन जगताप, शेख अबरार, आलीया अंजुम, साधना जगताप यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
Khamgao Congress : मार्गदर्शनाच्या आड ‘वर्चस्व’ची लढाई; खामगावात काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडी
उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








