Vijay Wadettiwar targets CM devendra Fadnavis on diesel shortage : इंधन टंचाईवरून सरकारवर वडेट्टीवर यांचा तीव्र प्रहार
Nagpur राज्यात सर्व काही सुरळीत असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर आता तीव्र भाषेत टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांचे दावे कितीही पोकळ असले, तरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील चित्र मात्र सरकारच्या अपयशाची सत्य परिस्थिती ओरडून सांगत आहे. वाशिम जिल्ह्यात आज सलग नवव्या दिवशी डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांच्या मैलोन्मैल लांब रांगा लागल्या आहेत. रात्रंदिवस रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने, शेतकऱ्यांचे सरकार म्हणवून घेणारे मुख्यमंत्री नक्की कुठे आहेत? असा संतप्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीववर यांनी केला .
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून विरोधक आणि शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर थेट हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री सत्तेच्या धुंदीत मश्गूल असून त्यांना जमिनीवरील ढळढळीत सत्य दिसेनासे झाले आहे. राज्यात इंधनाचा तुटवडा असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रशासन जनतेची दिशाभूल करत आहे, अशी टीका आता होत आहे. एसी दालनात बसून खोट्या घोषणा देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी वाशिमच्या पेट्रोल पंपावर येऊन शेतकऱ्यांचे हाल पाहावेत, असा संताप व्यक्त केला जात आहे.
Petrol diesel price : इंधन दरवाढीचा झटका! सरकारच्या निर्णयाने पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग
या इंधन टंचाईचा थेट परिणाम राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची भीती वर्तवली जात आहे. ट्रॅक्टरला डिझेलच नसल्याने शेतातील मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. जर वेळेत पेरण्या झाल्या नाहीत, तर उत्पादन घटणार हे निश्चित आहे. याचा अंतिम फटका संपूर्ण देशाला बसेल, बाजारात अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण होईल आणि महागाई गगनाला भिडेल. आज जो शेतकरी डिझेलसाठी वणवण भटकतोय, उद्या सामान्य जनतेला अन्नधान्यासाठी वणवण भटकावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
Fuel crisis : डिझेलसाठी महाराष्ट्र पेटला, इंधन टंचाईने पेरणीपूर्व मशागत ठप्प!
मुख्यमंत्र्यांनी आतातरी आपली झोप मोडावी, खोटेपणा बंद करावा आणि राज्यातील इंधन पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे सरकारने थांबवावे; अन्यथा या टंचाईमुळे ग्रामीण भागात जो तीव्र जनउद्रेक निर्माण होईल, त्याला सामोरे जाण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी ठेवावी, असा कडक आणि थेट इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे.








