Resignation of Ashwin Navale, Shiv Sena’s Akola district chief, rejected : बाजोरियांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन शिवसेना अकोला जिल्हाप्रमुखाने दिला होता राजीनामा
Akola शिवसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवला होता. मात्र, पक्षाने हा राजीनामा नामंजूर केला आहे. राजीनाम्याची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी नवले यांना मुंबईत बोलावले. येथे बाळासाहेब भवनात शिवसेना सचिव संजय माशिलकर यांनी नवले यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे व अडचणी समजून घेतल्या. सविस्तर चर्चेनंतर माशिलकर यांनी नवले यांची समजूत काढत त्यांचा राजीनामा नामंजूर केला.
दरम्यान, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत नवले यांनी राजीनामा दिला होता. यावर चर्चा करताना, कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली किंवा वैयक्तिक राजकारणासाठी शिवसैनिकांचा वापर होऊ दिला जाणार नाही, असा ठाम संदेश माशिलकर यांनी दिला.
तसेच, सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी अधिक जोमाने कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. पक्षाच्या वतीने नवले यांना पूर्ण पाठिंबा देत, त्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे तसेच संपूर्ण शिवसेना उभी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल हेही उपस्थित होते.








